बीड : जूनमध्ये चांगले संकेत देणाऱ्या पावसाने पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या सरासरीच्या पुढे जात असतानाच मागील सात दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने यंदा ५० टक्के तूट निर्माण झाली आहे. हा अनुशेष आगामी काळात पडणारा पाऊस भरुन काढेल अशी आशा सर्वांना आहे. दरम्यान, सोमवारी दुपारपासून आभाळ भरुन आले. चांगला पाऊस पडेल अशी आशा बाळगणाºया बीडकरांना हलक्या स्वरुपाच्या पावसाने काहीअंशी सुखावले.
गेवराई तालुक्यात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास पाडळसिंगी व परिसरात तब्बल एक तास पाऊस झाल्याने ओढ, नाल्या, रस्त्यांवर पाणी झाले होते. सिरसदेवी परिसरात अर्धामसला, रानमळा, खांडवी, भेंडटाकळी, पाडूळ्याची वाडी येथे पाच वाजता सरी कोसळल्या. यामुळे तूर, मका, कापूस, सोयाबीन या पिकांना उगवण क्षमतेसाठी दिलासा मिळाला आहे. गेवराई शहरातही सकाळपासून चार टप्प्यांमध्ये सौम्य पावसाने हजेरी लावली.
उपळी, गावंदरा येथे काही वेळ तर भोगलवाडी, तेलगाव परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. या भागात कपाशी लागवड केलेल्या शेतकºयांना मात्र दिलासा मिळाला आहे. शिरुर कासार तालुक्यात दुपारी काही भागात तासभर रिमझिम पाऊस झाला. १५ दिवसानंतर पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वारे होते. मात्र जोरदार पावसाची सर्वाांनाच प्रतीक्षा आहे.