लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गुरुवारी रात्री तसेच शुक्रवारी पहाटे व दिवसभरात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका होणार असून काढणीला आलेला हरभरा, गहू काही प्रमाणात भिजला आहे. या पावसामुळे आंबा, टरबुज, खरबुजांचे नुकसान झाले असलेतरी हे प्रमाण अल्प असल्याचे सांगण्यात आले.
बीड तालुक्यात गुरुवारी रात्रीपासूनच पावसाळी वातावरण बनले. शुक्रवारी पहाटे रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर माजलगाव तालुक्यात सकाळी सहा वाजेपासून पावसाची भुरभुर सुरु होती. तालुक्यात तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. धारुर तालुक्यात गुरुवारपासून ढगाळ वातावरण होते. रात्री आसरडोह, तेलगाव, मोहखेड, हसनाबाद, कोळपिंप्री परिसरात सौम्य पावसाने हजेरी लावली. गेवराई तालुक्यात शुक्रवारी पहाटे व सकाळी भुरभुर पाऊस झाला.
पाटोदा तालुक्यातील कुसळंब, चिंचोली, धनगर जवळका, महासांगवी, पाटोदा, वैद्यकिन्ही, डोंगरकिन्ही, अंमळनेर, पिंपळवंडी भागातही रिमझिम पाऊस झाल्याचे आमच्या वार्ताहराने कळविले आहे. या पावसामुळे उभे ज्वारीचे पीक, गहू, आंब्याला चांगला फटका बसला आहे. आष्टीसह धानोरा, कडा, टाकळशिंग, दौला वडगाव परिसरात शुक्रवारी पहाटे पावसाच्या सरी पडल्या. वडवणी, केज, परळी, अंबाजोगाई, शिरुर भागातही अशीच स्थिती होती. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारठा निर्मार जाला असून शेतातील धान्य, फळे आणि भाजी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
यंदा उशिरा अवकाळीहोळीचा फड शिंपडण्यासाठी गुढी पाडवापर्यंतच्या कालावधीत पाऊस हजेरी लावतो असा अनुभव आतापर्यंतचा आहे. या वेळी उशिरा अवकाळी पाऊस झाला.