परळी (बीड) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 3 जानेवारी रोजी परळी दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त येथे शुक्रवारी मराठवाडय़ातील मनसे प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
मनसेचे परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी सांगितले की, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नववर्षात परळी दौरा होणार आहे. त्यांचे दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, गोपीनाथ गड येथे हेलीकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर मोटारीने ते परळी कोर्टात उपस्थित राहतील.
कोर्टात काय आहे प्रकरण ?2008 मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबई येथे अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याचे पडसाद परळीत उमटले. परळी - धर्मापुरी पॉईंटवर कार्यकर्त्यांकडून दगडफेकीत बसचे नुकसान झाले होते. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यावर व चिथावणीखोर विधानाबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी परळी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यासाठी राज ठाकरे परळी कोर्टात ३ जानेवारी रोजी हजर राहणार आहेत.
मनसेकडून सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कारमनसे नेते दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, राज्य उपाध्यक्षा वर्षा जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या प्रसंगी मराठवाडय़ातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीस बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, परभणी जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, शेख राज, रूपेश देशमुख, लातूर जिल्हाध्यक्ष संजय राठोड, शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्क्ष बालाजी मुंडे, जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय दहिवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, तालुकाउपाध्यक्ष विठ्ठलराव झिल्मेवाड, ऋषिकेश बारगजे, हनुमान सातपुते, प्रशांत कामाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.