- संजय खाकरेपरळी ( बीड): राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कृषी मंत्री धनंजय मुंडे व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. तुल्यबळ म्हणून चर्चेत आलेले राजेभाऊ फड यांनी माघार घेतली आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात एकूण 58 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दहा उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये अवैध ठरले होते. 48 उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये वैध ठरले होते. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी एकूण 35 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. यापूर्वी दोघाजणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता 11 उमेदवार राहिले आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड, अपक्ष उमेदवार राजेश देशमुख व प्रभाकर वाघमोडे, दिलीप बिडगर यांच्यासह एकूण 37 जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यामुळे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे धनंजय पंडितराव मुंडे व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब श्रीकिशन देशमुख या दोघांमध्ये सरळ लढत होईल.
11 उमेदवार आहेत रिंगणात:धनंजय पंडितराव मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट , राजेसाहेब श्रीकिशन देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, डी एल उजगरे बहुजन समाज पार्टी, केदारनाथ जाधव पीजेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया. भागवत वैद्य विकास इंडिया पार्टी , साहस आदोडे मराठवाडा मुक्ती मोर्चा, अल्ताफ खाजा मिया सय्यद अपक्ष ,दयानंद लांडगे अपक्ष, राजेसाहेब सुभाषराव देशमुख अपक्ष ,शाखेर अहमद शेख अपक्ष, हिदायत सादिक अली सय्यद अपक्ष यांचा समावेश आहे. ...
यांनी घेतली माघार :राजाभाऊ श्रीराम फड, जयवंत ऊर्फ राजेश देशमुख, दिलीप बिडगर, प्रभाकर वाघमोडे, राजश्री धनंजय मुंडे, प्रमोद बिडगर, सेवकराम जाधव, मुस्तफा मैनोदीन शेख यांच्यासह एकूण 37 जणांनी माघार घेतली आहे.
मत विभाजन टाळण्यासाठी माघार - राजेभाऊ फडपरळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मतात फूट पडून पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी मी निवडणुकीतून माघार घेतली. आगामी काळात तेवढ्याच ताकदीने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार असल्याचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी सांगितले. सोमवारी त्यांनी आपला अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेऊन पक्षाचे काम निष्ठेने करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.