बीड : कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध सैल झाल्यानंतर ठिकठिकाणच्या आगारांमध्ये थप्पीला लागलेल्या बस पुन्हा रस्त्यावर दिमाखात धावू लागल्या आहेत. राखी पौर्णिमेच्या सणासाठी बहीण- भावाची भेट घडवून आणण्याकरिता एसटी महामंडळाने बसची संख्या वाढविली आहे. प्रवाशांच्या गर्दीने स्थानकेही गजबजू लागली आहेत. जिल्ह्यात आठ आगारांमध्ये ५४७ बस आहेत. यापैकी सध्या ४२० बस प्रवाशांच्या दिमतीला सज्ज झाल्या आहेत. उर्वरित बसदेखील टप्प्याटप्प्याने पूर्ववत वाहतुकीसाठी उपलब्ध होतील. निर्बंध शिथिलतेनंतर जिल्ह्यातील आठ आगारांमधील प्रवासी संख्या पाच हजारांपर्यंतच होती. मात्र, प्रवासी संख्येचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला असून आता ६३ हजार प्रवासी बसमधून प्रवास करत असल्याची नोंद आहे.
....
प्रवाशांची गर्दी
कोरोनामुळे नातेवाइकांच्या भेटीगाठी दुरापास्त झाल्या होत्या. मात्र, राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आता बहीण - भावांची भेट होणार आहे. शिवाय इतर सणोत्सवांमुळे नातेवाइकांच्या भेटीगाठी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बसस्थानके पूर्वीप्रमाणेच गजबजू लागली आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याकडे प्रवाशांचाही कल आहे.
...
रक्षाबंधन हा सर्वाधिक भारमानाचा (प्रवासी संख्येचा) दिवस असतो. गतवर्षी रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट होते. यंदा निर्बंध शिथिल झाल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रमुख मार्गांवर बसफेऱ्या वाढविलेल्या आहेत. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करून एसटीनेच सुरक्षित प्रवास करावा.
- अजयकुमार मोरे, विभागीय नियंत्रक, बीड
...
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
नांदेड पनवेल
औरंगाबाद हैदराबाद
औरंगाबाद रेणुगुंटा
पूर्णा हैदराबाद
साईनगर सिकंदराबाद
...
या मार्गावर वाढल्या फेऱ्या
बीड औरंगाबाद
अंबाजोगाई औरंगाबाद
बीड पुणे
बीड मुंबई
अंबाजोगाई पुणे