सखाराम शिंदे
गेवराई : शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र राक्षसभुवन हे प्रसिद्ध ठिकाणी आहे. याच गावातील विज्ञान गणेश मंदिरातील गणेशाची प्राचीन गणपती म्हणून ख्याती आहे. शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे स्थळ विकासापासून दुर्लक्षितच राहिले आहे.
श्रीक्षेत्र राक्षसभुवन हे शनि मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. मात्र, याच राक्षसभुवनमध्ये गोदावरी नदीकाठी अतिप्राचीन व पौराणिक कथा असलेले विज्ञान गणेश मंदिर देखील प्राचीन असून, या मंदिराचे दगडी बांधकाम व भव्य असे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव काम केलेले भव्य कळस (शिखर) आहे. संपूर्ण भारतामध्ये २१ गणपतीचे स्वयंभू पीठ आहेत. यापैकी ९ वे संपूर्ण पीठ विज्ञान गणेशाचे आहे. महान तपस्वी अत्री ऋषी व माता अनुसया यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अंशरूप चंद्रात्रय, दूर्वात्रय व दत्तात्रय यांचा पुत्र म्हणून सांभाळ केला. परंतु, दूर्वात्रय व चंद्रात्रय हे तपश्चर्येसाठी हिमालयात निघून गेले व प्रभू दत्तात्रय हे येथेच योगसाधना करून विज्ञान गणेशाला प्रसन्न करून त्यांची येथेच स्थापना केल्याची आख्यायिका सांगितली जाते. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा विज्ञान गणेश मंदिराचा गेल्या अनेक वर्षांपासून कसलाच विकास झाला नाही. पौराणिक संदर्भ व महत्त्व असलेले हे मंदिर दुर्लक्षितच राहिले आहे.
(चौकट)
प्रभू श्री दत्तात्रय यांनी या गणपतीची स्थापना केलेली असून, याचा उल्लेख मुदगल ग्रंथात व गणेश कोषात आढळतो. विज्ञान गणेश मंदिराचा आजपर्यंत कोणत्याच पुढाऱ्यांनी कसलाच विकास केला नाही. हे मंदिर फार जुने आहे, याची माहितीदेखील अनेकांना नाही. पुरातत्त्व विभागाने या मंदिराकडे लक्ष देऊन विकास करावा, असे माजी सरपंच प्रदीप काळम यांनी सांगितले.
130921\sakharam shinde_img-20180912-wa0031_14.jpg~130921\sakharam shinde_img-20180912-wa0035_14.jpg