- पुरुषोत्तम करवा
माजलगाव (बीड) : तालुक्यातील रामपिंपळगाव येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली असून ७ सदस्यांपैकी एकाच घरातील ४ सदस्य यात निवडून आली आहेत.
आज सर्वत्र निवडणुकांमध्ये जीवघेणी स्पर्धा पहावयास मिळते. खुपदा ही स्पर्धा नातलगामध्ये तणाव निर्माण करणारी ठरते. मात्र याला छेद दिला आहे. माजलगाव तालुक्यातील रामपिंपळगाव या गावाने. हे गाव अवघ्या 125 उंबऱ्यांचे असून येथील मतदार संख्या ही 450 इतकी आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत येथील चाळक कुटुंबियांवर गावक-यांनी विश्वास दाखवत या घरातील चार उमेदवारांना बिनविरोध निवडून दिले.
यात लहुराव चाळक हे सदस्य झाले असून त्यांची एक सून मनीषा यांना सरपंच पदाचा मान मिळाला, दुसरी सून सुनीता व मुलगा महेश हे देखील सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महेश यांनाच ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवली.
सर्व पदे एकाच घरात चाळक परिवारातील भगवान चाळक हे सलग 25 वर्ष सेवा सोसायटी चे चेअरमन होते. त्यांच्यानंतर महेश चाळक हे अडीच वर्ष चेअरमन होते. महेश यांनी उपसरपंच पदाचा कारभार हाती घेताच चेअरमन पदाचा राजीनाम दिला. यानंतर दुसऱ्याला चाळक परिवाराने चेअरमन पदावर विराजमान केले.