माजलगाव
: भारतीय समाज जात, धर्म, वर्ग विषमतेने ग्रस्त आहे. ही विषमता मानणाऱ्या शक्ती आज प्रबळ झालेल्या आहेत. स्त्रियांना गुलामीत ढकलण्यात येत आहे. शोषणमुक्तीची ही लढाई अंत:करणात रमाई, डोक्यात भीमाई ठेवूनच लढावी लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषद सदस्य प्रो.डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या माजलगाव शाखेच्या वतीने सांचद् बुद्धविहार,आंबेडकर भवन येथे त्यागमूर्ती रमाई जयंतीनिमित्त डॉ. अहिरे यांचे व्याख्यान झाले. माया दयानंद स्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. यावेळी डॉ. अहिरे म्हणाल्या, बहुजनांची गुलामीतून मुक्तता करण्याची लढाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढत होते. जगाने ज्ञानाचे प्रतीक ठरविलेल्या बॅरिस्टरांची पत्नी फाटके लुगडे नेसून डोक्यावर गोवऱ्या गोळा करीत होती. कुपोषणाने, उपचारांअभावी आपली रमेश, गंगाधर, इंदू, राजरत्न ही चार मुले मातीआड लोटली. बहुजनांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी रमाईने अनंत यातना सोसल्या. म्हणूनच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढू शकल्याचे त्या म्हणाल्या.
बाबासाहेब आंबेडकर व रमाईने ज्या समतामूलक समाजाचे स्वप्न पाहिले त्याच्या विपरीत परिस्थिती आज आलेली आहे. संविधान, शिक्षण, आरक्षण, संरक्षण, न्याय संस्था, शेती, माध्यमं, सगळे धोक्यात आली आहेत. उद्योग, शिक्षणाचे खासगीकरण केले जात आहे. लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अंत:करणात रमाईची करुणा व डोक्यात भीमाई म्हणजेच बाबासाहेबांचा लढाऊबाणा ठेवावा लागेल. संघर्षाला सिद्ध व्हावे लागेल. रमाईने सामाजिक समतेसाठी दिलेल्या आहुतीला सार्थकता येईल, असे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस. बी. मोरे, कमल डोंगरे, गुलाबराव प्रधान, बी. सी. डोंगरे, लिला उजगरे, एन. बी. राजभोज, शामराव वाघमारे, के. व्ही. साळवे, डी. ई. उजगरे, वाल्हाबाई टाकणखार, गयाबाई आव्हाड, उषा मोरे, डॉ. दिगंबर बोबडे, नगरसेवक सुदामती पौळ, उषा बनसोडे, स्वाती डोंगरे, आदींची उपस्थिती होती.
गुलाबराव धाईजे, के. व्ही. साळवे यांनी प्रास्ताविक केले. वंदना घनगाव यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सिद्धार्थ वक्ते, विजय धाईजे, प्रा. शाहू घनगाव, विजय साळवे, डॉ. भागवत साळवे, डी. पी. पोटभरे, जीवन जाधव, शारदा टाकणखार, कमल मोरे, वैभव साळवे, लिला उजगरे, अँड. चेतना टाकणखार, कमल गायकवाड, आदींसह नागरिक उपस्थित होते. व्याख्यानानंतर मधुकर कदम आणि संचाचा परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम पार पडला.