माजलगाव (बीड ), दि. 6 : मेघराज आडसकर यांची आत्महत्या त्यानंतर बाबुरावजी आडसकर यांचे दु:खद निधन यातून आडसकर कुटूंबिय सावरते न सावरते तोच आडसकर कुटूंबियावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला असून रमेश आडसकर यांच्या भगिणी पुष्पा बाळासाहेब देशमुख (वय ५२ वर्ष) यांनी माजलगाव येथील धरणात आत्महत्या केल्याची घटना दि.६ रोजी सायंकाळी ७.३० वा. सुमारास उघडकीस आली.
माजलगाव धरणात असलेल्या माजलगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणा-या जॅकवेल जवळ एक अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती येथील काही पोहायला जाणा-या युवकांनी दिल्यानंतर पोलिस या ठिकाणी पोहचले व मृताची पाहणी करीत असताना हा मृतदेह रमेश आडसकर यांच्या भगिणी पुष्पा बाळासाहेब देशमुख यांचा असल्याचे निदर्शनास आले. सदरील ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करून रात्री ९.३०च्या दरम्यान मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर रुग्णालयाच्या परीसरात एकच गर्दी पहावयास मिळत होती. घटनेची माहिती आडसकर कुटूंबियांना देण्यात आलेली असून शवविच्छेदना संदर्भातील पुढील प्रक्रिया सुरू होती. दरम्यान पुष्पा बाळासाहेब देशमुख यांचे पती अॅड.बाळासाहेब देशमुख यांचे देखील मागील काही वर्षांपुर्वी निधन झालेले असून आडसकर कुटूंबियांवर अवघ्या दिड वर्षात हा तिसरा दु:खाचा डोंगर कोसळल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली या बाबत अजून तरी काहीही सांगणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुष्पा देशमुख यांचे माजलगाव शहरामध्ये दोन ठिकाणी जागा असून त्या या संदर्भाने माजलगावी येत असत अशी माहिती समजते. रमेश आडसकर भाजप चे बीड मधील मोठे नेते आहेत , त्यांचे वडील दिवंगत बाबुराव आडसकर हे माजी आमदार होते. ते राजकारणात " हाबाडा पॅटर्न " साठी प्रसिद्ध होते .