लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील सिरसदेवी येथील शेतकरी व त्याचा पुतण्या शेतातील मोसंबीच्या बागेत गेले असता रानडुकराने हल्ला करून पुतण्याला गंभीर जखमी केले. तर त्याला वाचवायला गेलेल्या चुलत्यावरही डुकराने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. दोघांवर बीड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पांडुरंग साहेबराव नांदे (वय ३७) व सार्थक बाळू नांदे (४ रा. दोघे सिरसदेवी, ता. गेवराई) अशी जखमींची नावे आहेत. दोघेही गुरूवारी सकाळी आपल्या शेतातील मोसंबीच्या बागेत गेले. अचानक समोरून आलेल्या रानडुकराने सार्थकवर हल्ला केला. हे दृष्य चुलता पांडुरंग पाहत असतानाच त्याला वाचवण्यासाठी रानडुकरावर धावून गेला. मात्र रानडुकराने त्यांच्यावरही ह हल्ला चढवत गंभीर जखमी केली. त्या दोघांनाही बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पुतण्या सार्थकला पोटाला गंभीर मार लागला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकरी तसेच शेतमजुरांवर रानडुकरांचे हल्ले वाढले आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.