अंबाजोगाई-परळी राज्य रस्त्यावर असणाऱ्या दूरदर्शन उच्च शक्ती प्रक्षेपण केंद्राच्या पायथ्याशी स्वत:च्या जागेत चार वर्षांपूर्वी समाज शिक्षणाची (एमएसडब्ल्यू) पदवी पूर्ण केलेल्या पवन गिरवलकर या तरुणाने हा आश्रम सुरू केला आहे.
भारतीय जैन संघटनेचे गिरीश शहा आणि मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन वडील सोमनाथ अप्पा गिरवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या आश्रमात प्रामुख्याने कुटुंबापासून दुरावलेल्या व दुखावलेल्या वृद्धांना आपले उर्वरित जीवन सुखाने जगण्यासाठीचे प्रयत्न केले जातात. राहण्यासाठी महिला व पुरुषांसाठी दोन स्वतंत्र हॉल, प्रत्येक वृद्धास पलंग, गादी व स्वतंत्र कपबोर्ड, जेवणासाठी स्वतंत्र भोजन कक्ष, प्रत्येकाला बसायला खुर्ची, टेबल, प्रशस्त स्वयंपाक घर, टॉयलेटमध्ये आवश्यक तेवढे कमोड, बाथरूम, भाजीपाला पिकविण्यासाठी थोडी मोकळी जागा, छोटीशी बाग, असे या आश्रमाचे स्वरूप आहे.
या भारती प्रेम आश्रमात राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती, सण-वार पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. प्रत्येक सदस्य आपापल्या परीने आपली काळजी घेतातच. याही पेक्षा अधिक काळजी ते एकमेकांची घेतात. सर्व सदस्य वृद्ध असल्यामुळे त्यांचा बीपी, शुगर व इतर आजाराची काळजी, त्यांचा दवाखाना, औषधपाणी हे सर्व करण्यासाठी वृद्धाश्रमात एका रुग्णवाहिकेची सुविधा या आश्रमात आहे. अशा या आश्रमात हुरड्याच्या सीझनमध्ये हुरडा पार्टी ही पवन यांच्या पुढाकाराने होते. सावरे यांच्या शेतातली गूळभेंडी ज्वारीची कणसं, गव्हाच्या ओंब्या आणल्या जातात. वृद्धाश्रमातल्या स्वयंपाकघरात हुरड्यासोबत लागणारी शेंगदाणा, तिळाची चटणी यांचा खमंग वास सुटायला लागतो. इतर सदस्य हुरडा भाजण्याची पूर्वतयारी करण्यात मग्न होतात. वृद्धाश्रमातील नामदेव आजोबा हुरडा भाजण्यासाठी छानशी आकटी तयार करतात. आश्रमातील सर्व सदस्य आपल्या गत जीवनातील कडुगोड आठवणी काढत उद्याची सुंदर स्वप्न पाहत या हुरडा पार्टीत रंगून जातात.
===Photopath===
030321\03bed_3_03032021_14.jpg