Ranjit Kasle ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी ईव्हीएमबाबत धक्कादायक दावा केला आहे. 'ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते. ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते', असा दावा रणजीत कासलेने केला होता. या प्रकरणी आता प्रशासनाने अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
बीड जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला आहे. या अहवालात विधानसभा निवडणुकीदरम्यान रणजीत कासलेला परळी मतदारसंघात ड्युटीच नव्हती, असं सांगण्यात आलं आहे. निवडणुकीवेळी कासले हे सायबर विभागामध्ये कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
बीड जिल्ह्यातील बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले याने आपल्याला परळीला बंदोबस्त दिला. तसेच ईव्हीएम मशीन ठेवल्या त्या ठिकाणी बंदोबस्त असतानाही तेथून हटविण्यात आले. तसेच बँक खात्यावर दहा लाख रुपये पाठविले, त्यातील साडेसात लाख रुपये परत केले आणि अडीच लाख रुपये निलंबित झाल्यानंतर खर्च केल्याचे सांगितले.
दरम्यान, यावरुन निवडणूक आयोगाने बीड प्रशासनाकडून माहिती मागवली होती. यामध्ये बीड प्रशासनाने अहवाल दिला. यामध्ये परळी मतदार संघाशी संबंधित कोणत्याही ड्युटीवर कासले नव्हता. मतदान केंद्र, स्ट्राँग रूम किंवा मतमोजणी केंद्र यापैकी कुठेही कासलेची ड्युटी नव्हती.निवडणूक काळात ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य शासनाची मिळून तीन स्तरीय सुरक्षा होती. यामध्ये रणजीत कासले यांचा समावेश नव्हता, असं अहवालामध्ये आहे.