बीड : नेकनूर पोलीस ठाण्यात ‘हनी ट्रॅप’मध्ये तरुणाला अडकवत १५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील ३ आरोपींना सोमवारी ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी अटक केलेल्या तिघांना ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नितीन रघुनाथ बारगजे (रा.टाकळी ता.केज) यांना आष्टी येथील सविता वैद्य व सुरेखा कदम या महिलेने विटा खरेदी करायच्या आहेत, असा बहाणा करून आष्टी येथील घरी नेऊन लगट करत व्हिडीओ तयार केला होता. तो व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाखांची मागणी केली होती. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात नितीन बारगजे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा कदम, सविता वैद्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील शेखर वेदपाठक, सविता वैद्य व सुरेखा कदम यांना रविवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी उशिरा प्रशांत श्रीखंडे, वैभव पोकळे, योगेश मुटकुळे यांना अटक केली. या कटात सामील असलेला पोलीस कर्मचारी कैलास गुजर मात्र हाती लागलेला नाही.