- फोटो
बीड : येथील राज्य परिवहन महामंडळचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांना कार्यालयात जाऊन वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यासह इतर ८ ते १० जणांवर गुन्हाही नोंद झाला. परंतु त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी शुक्रवारी कर्मचारी आक्रमक झाले होते. दिवसभर काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.
भांडार विभागातील एका महिला कर्मचाऱ्यावर कामचुकारपणा केल्यामुळे कारवाई करण्यात आली. त्या महिलेवर कारवाई का केली, असे म्हणत लाकडी काठी उगारून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पुन्हा शिवीगाळ केली. याप्रकरणी बांगरसह ८ ते १० जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याच घटनेचे पडसाद शुक्रवारी दिसले. कार्यालयात येण्यापूर्वीच विविध संघटना आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या गुंडगिरीविरोधात निदर्शने केले. बांगरसह इतरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले. तसेच दिवसभर काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
राजकीय पुढाऱ्यांची गुंडगिरी
राजकीय पुढारी शासकीय कार्यालयात जाऊन गुंडगिरी करीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी नगरपालिका, नगर पंचायत, आरोग्य विभाग अशा विविध कार्यालयांत अशा घटना घडलेल्या आहेत. आता यात बांगरने आणखी भर टाकली आहे. पुढाऱ्यांच्या या गुंडगिरीवर लगाम लावण्याची मागणी होत आहे.
कोट
काम न केल्याने एका कर्मचाऱ्यावर विभागप्रमुखांच्या अहवालावरून कारवाई केली होती. त्यात कसलीही चूक नाही. याच अनुषंगाने बांगरसह इतर ८ ते १० लोक कार्यालयात येऊन मला जिवे मारण्याची धमकी देऊन गेले. त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. अशी गुंडगिरी थांबायला हवी. अधिकाऱ्यांना मारायला उठणारे हे लोक कर्मचाऱ्यांचे तर जगणे मुश्कील करतील.
भगवान जगनोर
विभागीय नियंत्रक, रापम, बीड