केज (बीड ) : नदीवर खेकडे पकडण्यासाठी जाण्याचे आमिष देत एका युवकाने चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केले. ही घटना बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे घडली. याप्रकरणी पिडीतेच्या पालकांनीच आरोपीस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
दहिफळ वडमाऊली येथील एक कुटुंब ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. बुधवारी ते ऊस तोडणीस जाण्यासाठी बांधाबांध करत होते. यावेळी आण्णा प्रभाकर गदुळे त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने तेथे आला. यावेळी सर्वजण कामात व्यस्त असल्याचे पाहून त्याने मजुराच्या चार वर्षीय मुलीस नदीवर खेकडे पकडण्यास जाऊ असे आमिष दिले. चिमुकली व तिच्या लहान भावास सोबत घेऊन तो नदीकडे निघाला, मात्र मध्येच थांबत त्याने शेजारील शिवारात चिमुकलीवर अत्याचार केले.
काही वेळाने मजूर कुटुंबाला मुले घरात नसल्याचे लक्षात आले. शोधाशोध केली असता अण्णासोबत शिवारात मुले असल्याची माहिती मिळाली. यावेळी शिवारात एका झुडपात अण्णा चिमुकलीसह लपून बसल्याचे दिसले. नातेवाईकाने त्याला पकडले असता चिमुकलीने आपबिती सांगितली. नातेवाईकांनी त्याला पकडून केज पोलिसांच्या ताब्यात दिले.
चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरून त्याच्यावर केज पोलीस स्टेशनला एफआयआर क्र.५४२/२०१८ भा.दं.वि. ३७६ (१) (२) आणि बाल लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम ३ व ४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष कदम हे करत आहेत.