केज ( बीड ) : शेतातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध केल्याने एका विवाहितेवर घरात घुसून अत्याचार केल्याची घटना रविवारी केज तालुक्यात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीपान विश्वनाथ चौरे असे आरोपीचे नाव असून केज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
केज तालुक्यातील संदीपान विश्वनाथ चौरे यास एका महिलेने तिच्या शेतामधून ट्रॅक्टर घेऊन जाण्यास विरोध केला. याचा राग मनात धरून संदीपान चौरे रविवारी पीडिता एकटी असल्याचे पाहून घरात घुसला. मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत चौरेने अत्याचार केला. पिडीतीने अत्याचाराची माहिती दिरास दिली. यामुळे आरोपीचा भाऊ सुखदेव चौरे व वडील विश्वनाथ चौरे यांनीपीडिता आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी पिडीतेने रविवारी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यावरून संदीपान चौरे, सुखदेव चौरे व विश्वनाथ चौरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस जमादार नखाते, महिला पोलीस जमादार रुक्मिणी पाचपिंडे व पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांनी आरोपी संदीपान विश्वनाथ चौरे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास प्रभारी ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक व पिंक पथकाच्या प्रमुख सिमाली कोळी या करीत आहेत.