बीड : अल्पवयीन मुलीचा भंग केल्याप्रकरणी आरोपी अरुण छबू पुलावले (वय १८, रा. देवीगव्हाण ता. आष्टी) यास तीन वर्षे सश्रम कारावास आणि १५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. एस. एस. महाजन यांच्या न्यायालयाने सुनावली.
अल्पवयीन पीडित मुलगी शाळेत जाताना वेळोवेळी तिला अडवून अरुण पुलावले हा बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने ९ मार्च २०१८ रोजी ही मुलगी हापश्यावर पाणी भरताना तिचा विनयभंग करून तिच्या आई- वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात कलम ३५४ (अ), ३५४ (ड), ३४१, ५०६ भादंविसह कलम ८,१२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल झाला. सपोनि व्ही. व्ही. शहाणे यांनी तपास करून सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयात अंतिम दोषारोपपत्र सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. एस. एस. महाजन यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. १४ सप्टेंबर रोजी अंतिम निर्णय देण्यात आला. या निर्णयानुसार आरोपी अरूण पुलावले यास दोषी ठरविण्यात आले. कलम ८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रूपये दंड , दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास तसेच कलम १२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमांतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व ५०० रूपये दंड, दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त सश्रम कारावास व कलम ५०६ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व ५०० रूपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू सरकारी अभियोक्ता आर. बी. बिरंगळ यांनी मांडली, तर पैरवीचे कामकाज सफौ सी. एस. इंगळे यांनी पाहिले.