बीड : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी भिमराव बळीराम धुमक (रा. घाटेवाडी, ता. केज, जि. बीड ) याला २० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड व दंड न भरल्यास दीड महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा केज येथील सत्र न्या. के. डी. जाधव यांच्या न्यायालयाने सुनावली.
या प्रकरणातील पीडित मुलीस भिमराव धुमक याने बळजबरीने कारमध्ये बसवून अंधोरा मस्सा, पंढरपूर, आळंदी व नंतर भोसरी येथे नेऊन भाड्याने रूम करून तेथे पीडितेची इच्छा नसतानादेखील तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध अपहरण, बलात्कार. ३४ भादंवि आणि कलम ४ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए. एन. वाठोडे यांनी करून अंबाजोगाईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्या. के. डी. जाधव यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर झालेला पुरावा व सहायक सरकारी वकील राम बिरंगळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी भिमराव बळीराम धुमक यास अतिरिक्त सत्र न्या. जाधव यांच्या न्यायालयाने दोषी ठरविले.
आरोपीस कलम ३६३ भादंविनुसार दोषी धरण्यात आले. त्यास पाच वर्षे कारावासाची शिक्षा व कलम ४ पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षे कारावास व पीडितेस एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी व नुकसान भरपाई न भरल्यास दीड महिना सश्रम कारावसाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात अभियोग पक्षाच्या वतीने राम बी. बिरंगळ यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील आर. पी. उदार, सहायक सरकारी वकील एस. व्ही. मुंडे, पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक लांडगे यांनी सहकार्य केले.