- संजय खाकरेपरळी( बीड): देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या ज्योतिर्लिंगाच्यास्थळी दिनांक 18 रोजी महाशिवरात्र उत्सव श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. महाशिवराञीचा महापर्वकाळ असून त्यात तब्बल अकरा वर्षांनी प्रदोष आणि महाशिवराञ असा दुर्मिळ योग यावर्षी जुळून आला आहे.
आज विजया भागवत एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिर आणि संत जगमित्रनागा मंदिरात रीघ लागली आहे. जगमित्रांच्या समाधी स्थळाचे व विठ्ठल- रुक्माईचे शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त दिनांक 15 फेब्रुवारीपासून श्री जगमित्र मंदिरात भव्य अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहरातील इतर महादेव मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी मंदिरात दर्शनासाठी महिला व पुरुष अशा दोन वेगळ्या रांगा असतील. तसेच पासधारकांची स्वतंत्र रांग असेल. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने श्री वैद्यनाथ मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून रंगरंगोटी करण्यात आली आहे. पायऱ्यांवर बॅरिकेटची सोय करण्यात येऊन मंडप उभारण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार अभिषेक महाशिवरात्री दिवशी दिनांक 18 फेब्रुवारी रात्री सहा ते आठ पर्यंत वैद्यनाथ देवस्थान विश्वस्त कमिटीतर्फे जिल्हाधिकारी बीड यांच्या शुभहस्ते रुद्राभिषेक करण्यात येईल. या अभिषेकानंतरच भाविकांना अभिषेकाची परवानगी देण्यात येईल. अभिषेकासाठी एका आवर्तनास एकास शंभर रुपये आणि सपत्निक दीडशे रुपये राहतील. मंदिर कार्यालयातून पावती घेतल्यास अभिषेक करता येईल. वार्षिक अभिषेक करणाऱ्यांनी देखील महाशिवरात्र अभिषेकाची वेगळी पावती घ्यावी लागेल. दर्शन पास रांगेतून जाण्यासाठी शंभर रुपयांचा दर्शन पास बंधनकारक आहे.
परळीकरांना दर्शन रांगेत सुट
परळी परिसरातील शिवभक्तांसाठी दर्शन पासच्या रांगेतून विनामूल्य दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिनांक 18 फेब्रुवारी शनिवारी रात्री दहा वाजेपासून रात्री बारापर्यंत पासच्या रांगेतून स्वतःचे ओळखपत्र ,आधार कार्ड ,मतदान कार्ड पॅन कार्ड इत्यादी दाखवून परिसरातील शिवभक्तांना दर्शन घेता येईल. दर्शन पास चे मूल्य 100 रुपये असून येथील मंदिर परिसरात वैद्यनाथ बँकेच्या स्टॉलवर उपलब्ध करण्यात आला आहे , शहरातील एसबीआय, आयडीबीआय ,बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँक दीनदयाळ बँक, वैद्यनाथ बँकेच्या शाखेत दर्शन पास विक्रीची व्यवस्था भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आली आहे.
सोमवारी निघेल पालखी सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीजींची पालखी सवाद्य मिरवणुकीने निघणार आहे. सायंकाळी सहा वाजता देशमुखपाराजवळ प्रसिद्ध गायक पंडित शंकर वैरागकर यांचा भक्ती गीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. आंबेवेस येथे रात्री नऊ वाजता शोभेची दारू उडविण्यात येणार आहे. त्यानंतर गणेश पार, नांदुरवेस, गोपनपाळे गल्ली येथे कलावंतांची हजेरी होईल नंतर आंबे गल्ली मार्गे रात्री मिरवणुकीने पालखी मंदिरात परत येईल. याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, सेक्रेटरी राजेश देशमुख व इतर विश्वस्तांनी केले आहे. महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त असणार आहे. यात्रेनिमित्त राहट पाळणे उभारण्यात आले असून खेळणीचे स्टॉल व इतर साहित्याचे दुकाने थाटण्यात आले आहेत.
तब्बल अकरा वर्षांनी दुर्मिळ योगमहाशिवराञीचा महापर्वकाळ त्यात तब्बल अकरा वर्षांनी प्रदोष आणि महाशिवराञ असा दुर्मिळ योग यावर्षी जुळून आला आहे. अशा या महापर्वकाळी प्रभू वैद्यनाथांचे शास्ञोक्त दर्शन घेण्याचा विधी महर्षी व्यासांनी सांगीतला आहे. त्यानुसार भावीकांनी विधीवत व्रत आणि दर्शन घेतले तर तो भावीक जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन, कैलासपदाचा अधिकारी होतो. असे परळी वैद्यनाथ पंचक्रोशीचे अभ्यासक गोपाळ रावसाहेब आंधळे यांनी म्हटले आहे.