बीड : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागातील नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. ती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या आता वाढणार असून, जिल्ह्यात नव्याने अंदाजे २४० दुकाने सुरू होणार आहेत.
या नव्या जाहीरनाम्यामुळे ग्रामीण भागातील आजमितीस रद्द असलेल्या, राजीनामा दिलेल्या व विविध कारणांमुळे नवीन रास्त भाव दुकानांना परवानगी दिली जाणार आहे. यामध्ये पंचायत समिती, ग्रामपंचायत, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था तसेच नोंदणी झालेल्या सार्वजनिक तसेच सार्वजनिक न्यास यांच्या माध्यमातून रेशन दुकाने सुरू करता येणार आहेत. याबाबतची कार्यवाही जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या
१९७३
शहरी भागातील दुकाने २६५
ग्रामीण भागातील दुकाने १७०८
जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती वाढणार दुकाने
बीड ३०
माजलगाव २०
वडवणी १६
धारुर १४
केज २२
अंबाजोगाई २२
आष्टी २५
गेवराई २६
पोटोदा १९
शिरूर कासार २०
परळी २८
शासनाच्या नियमाप्रमाणे शहरी भागातील जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुकानांची संख्या किती होईल हे सांगता येईल. अंदाजे २ हजार लोकसंख्येमागे एक दुकान अशी प्रक्रिया असणार आहे.
भारती सागरे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड