बीड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील खुल्या प्रवर्गातील मुले वगळता इतर पात्र विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप केले जाते. कोरोनामुळे चालू शैक्षणिक वर्ष उशिरा तेही असे तसेच सुरू झाले. दरवर्षी पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जात होते. यंदा मात्र प्रती विद्यार्थी एक गणेवेश वाटपाचे निर्देश देत शासनाने जिल्हा शिक्षण विभागाकडे निधी उपलब्ध केला होता. विद्यार्थी पटसंख्येनुसार हा निधी डिसेंबरमध्ये थेट शाळा व्यवस्थापन समित्यांना वर्ग करण्यात आला. गणवेश खरेदीचे अधिकार या समितीला असतात. अनेक ठिकाणी काही सदस्यांच्या मनमानीचा, तर काही ठिकाणी जि. प. पदाधिकाऱ्यांचा मुख्याध्यापकांना त्रास सहन करावा लागतो. परंतु जिल्ह्यात शाळा व्यवस्थापन समित्यांच्या समंजसपणामुळे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले. काही ठिकाणी मिळालेल्या निधीतून गणवेश खरेदी झाले; मात्र कोरोनामुळे विस्कळीतपणा आल्याने गणवेश वाटप होऊ शकलेले नाही, ते मार्चअखेरपर्यंत वाटप होतील, असे समजते.
बीड जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीतील पात्र मुले व मुलींना गणवेश वाटप करण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळांच्या खात्यावर विद्यार्थी संख्येइतका निधी वर्ग करण्यात आला. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करून वाटप केले.
एकूण शाळा २४९१
एकूण गणवेश ११७१८६
मुले ३१०४३
मुली ८६१४३
गणेशासाठी जि. प.ला उपलब्ध निधी ३५१५५०००
हेतू शुद्ध असल्यास अडथळे येत नाहीत
आमच्या शाळेतील पात्र १५० विद्यार्थ्यांना गणवेशासाठीचा निधी मिळाला. त्यानंतर तातडीने शाळा व्यवस्थापन समितीने गणवेशाच्या कापडाचा चांगला दर्जा निवडून खरेदी केले. सर्वच मुलांना गणवेश मिळावा, यासाठी लोकसहभागही मिळतो. मुख्याध्यापकांना समितीइतकाच अधिकार असतो, मात्र हेतू शुद्ध व सकारात्मकता असेल तर कुठेच अडचणी येत नाहीत, असे बीड तालुक्यातील घाटसाळवी जि. प. केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका उषा श्रीधर मुंडे यांनी सांगितले.
आमच्या शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य मिळाले. समितीचे पदाधिकारी, सरपंच, आदींच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात गणवेश वाटप केले. नंतर कोरोना नियमांचे पालन करून एकानंतर एकास बोलावून वाटप केल्याचे बीड तालुक्यातील वडगाव गुंदा जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बडे यांनी सांगितले.
---
शासनाकडून आलेला निधी थेट शाळा व्यवस्थापन समितीला मिळतो. या निधीचा योग्यरीत्या विनियोग होण्यासाठी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप न करता लक्ष दिले. या निधीचा योग्य कारणासाठी शंभर टक्के वापर व्हावा. अखर्चित निधी अथवा अद्याप गणवेश वाटप जेथे झाले नाही, तेथे आवश्यक सूचना दिल्या जातील. - बजरंग सोनवणे, शिक्षण सभापती, जि. प. बीड.
-------