धारूर : येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी ( दि. २७ ) आणखी एक प्रेतयात्रा तहसील कार्यालयात आणून समाज बांधवांनी संताप व्यक्त केला. तहसीलदारांनी लेखी आश्वासना दिल्यानंतर प्रेतयाञा हलवण्यात आली.
शहरातील लिंगायत समाजाची स्मशानभुमी तहसील कार्यालयाच्या दक्षिणेस आहे. सर्वे नं. ३७८ मध्ये ०.९९ आर जमीन लिंगायत समाजाची स्मशानभुमीसाठी आहे. या जमिनीवर लिंगायत समाजाच्यावतीने परंपरेनुसार दफनविधी करुन अंत्यविधी केला जातो. परंतू स्मशानभुमीकडे जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या ६ मीटर रस्त्यावर अतिक्रमण असल्याने जेसिबी किंवा तत्सम वाहन, शववाहिका नेण्यास अडचणी येतात. यासाठी गेल्या दोन वर्षांपासुन लिंगायत समाज सतत आंदोलन करुन रस्त्याची मागणी करत आहे.
या पूर्वीही दि.४ मार्च २०१९ रोजी लिंगायत समाजाच्यावतीने चक्क तहसील कार्यालयाच्या अभ्यंगत कक्षात प्रेत ठेवण्यात आले होते. आजपर्यंत प्रशासनाकडून कारवाई झाली नसल्याने गुरूवारी ही तहसील आवारात प्रेतयात्रा नेण्यात आली. नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी आंदोलकांची समजूत काढून प्रकरण तूर्त शांत करत केले. तसेच येत्या ३१ ऑगस्टपर्यंत स्मशानभूमीचा रस्ता मोकळा करुन देण्याचे आश्वासन दिले. यानंतर समाज बांधवांनी दुसऱ्या रस्त्याने प्रेतयात्रा स्मशानभूमीत नेत अंत्यविधी केला.