अविनाश कदम
आष्टी : ग्रामीण रुग्णालयात कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार न घेता ५ कोरोनाबाधितांनी धूम ठोकल्याची धक्कादायक घटना १० जून रोजी सकाळी ८.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आष्टी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
आष्टी तालुक्यातील पाच गावांतील नागरिकांना कोरोनाचा त्रास जाणवत असल्याने ते पाच जण ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोना टेस्ट करण्यासाठी १० जून रोजी सकाळी आले होते. येथे त्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. ती पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याच्या प्रक्रियेत आरोग्य कर्मचारी होते. मात्र, कोरोनाबाधित ५ जणांनी तेथून पळ काढला. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना शोधून काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते सापडले नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. याबाबत नोंद घेण्यात आली आहे.
आष्टी ग्रामीण रुग्णालयातील अँटिजन सेंटरमध्ये तालुक्यातील पाच रुग्ण कोरोना तपासणीसाठी गुरुवारी सकाळी आले होते. ते पाच जण अँटिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह निघाले. त्यांना दाखल होण्यासाठी सांगितले असता ते तेथून पळून गेले. त्यामुळे आष्टी पोलीस ठाण्यात पाच जण पळून गेले म्हणून लेखी पत्र दिले आहे.
- डॉ. राहुल टेकाडे,
कोविड सेंटर, वैद्यकीय अधीक्षक - आष्टी
कोविड सेंटरमध्ये दाखल न होता कोरोना पॉझिटिव्ह पाच रुग्ण पळून गेले आहेत, याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी आष्टी पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिले असून, तपास सुरू आहे.
- मच्छिंद्र उबाळे,
पोलीस नाईक, मुर्शदपूर, ता. आष्टी
आष्टी तालुक्यात असे प्रकार होत असतील तर भविष्यात कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह निघाले की पळून जाऊन घरीच उपचार घेतील. ते कोविड सेंटरमध्ये दाखल न होता इतर नागरिकांच्या संपर्कात आले तर पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होईल. नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेऊन याला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.