पॉझिटिव्ह स्टोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : १४ एकर जमीन. त्यातील सात एकरला जेमतेम पाणी. उन्हाळ्यात तर पाण्याचा शिमगाच असायचा. या जमिनीत एका ओढा आहे. पावसाळ्यात या ओढ्याचे पाणी वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी यंदा विहिरीत वळविले. विहीर पुनर्भरण केले. आता ही विहीर तुडुंब भरली आहे. या पुनर्रभरणामुळे यंदा जमिनीत हरितक्रांती निर्माण होणार आहे, असा विश्वास अंबाजोगाई तालुक्यातील वालेवाडी येथील प्रगतशील शेतकरी राजाराम गणगे यांनी व्यक्त केला आहे.
गणगे यांनी १९७१ ते १९८३ या दरम्यान इस्त्रोमध्ये नोकरी केली. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन औरंगाबाद येथे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट काढून अनेक युवकांना रोजगार मिळवून दिला. त्यानंतर गणगे यांनी गावाकडील शेती फुलविण्याचा निर्णय घेतला. सात एकर शेतीत त्यांनी दोन वर्षांपूर्वी विहीर खोदली. या विहिरीचा ७० फुटांचा घेरा आहे. सुमारे १४ परस ही विहीर आहे. तिला लाखो रुपये खर्च झाला. तरीही उन्हाळ्यात या विहिरीचे पाणी उपसत असे. मागील वर्षी सहा एकर उसाची लागवड केली. त्यात आंतर पिके घेतली. परंतु उन्हाळ्यात पाणीटंचाई भासली. या जमिनीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या सात एकर शेती फक्त पावसावर अवलंबून आहे. यंदा फक्त सहा एकरात त्यांनी ऊस लागवड केली आहे. त्यातून १२ लाखांचे उत्पन्न मिळेल, असा त्यांना विश्वास आहे.
....
अकरा हजारांत केले विहीर पुनर्रभरण
विहिरीच्या एक हजार फुटावर ओढा आहे. ओढ्यापासून २५ मीटर लांबपर्यंत चर खोदला. या चराची लांबी, रुंदी चार बाय पाच आहे. चर थेट विहिरीपर्यंत आणून सोडला. विहिरीजवळ १५ मीटर जवळ दगड, गोटे टाकून लेव्हल केली. त्यातून हे पाणी विहिरीत सोडले. पुन्हा विहीर भरल्यानंतर हे पाणी लेव्हल काढून ओढ्याला सोडून दिले आहे. यासाठी केवळ ११ हजार रुपयांचा खर्च आल्याचे राजाराम गणगे यांनी सांगितले.
...
शेतकऱ्यांना दर दोन वर्षांला दुष्काळी परिस्थितीला सामोर जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांनी पाणी अडविणे गरजेचे आहे. वाहून जाणारे पाणी अडवून शेतकऱ्यांनी साठवून ठेवले तर वर्षातील दोन पिकातून चांगले उत्पन्न मिळवून शकतो.
-राजाराम गणगे, वालेवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड.
150921\15_2_bed_10_15092021_14.jpg~150921\15_2_bed_9_15092021_14.jpg
ओढ्याच्या पाण्यातून विहिरीचे पुनर्रभरण~ओढ्याच्या पाण्यातून पुनरभरण केलेली विहीर.