बीड : तुम्हाला केबीसीचे बक्षीस लागले आहे... बँकेतून बोलत आहे.. केवायसी अपडेट करायचे आहे... अशा क्लृप्त्या अवलंबून सायबर भामटे तुमचे बँक खाते घरबसल्या साफ करू शकतात. जिल्ह्यात आठ महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीच्या तब्बल ८० घटना उजेडात आल्या. याद्वारे सुमारे ९५ लाखांपेक्षा अधिक रुपयांना गंडा घातला आहे.
जिल्ह्यात सायबर क्राइमचा आलेख वाढत चालला असून सुशिक्षित मंडळीही
गुन्हेगारांच्या मायाजालात अलगद अडकत असल्याची बाब समोर आली आहे. बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून अनेक जण स्वत:कडील पैसेही गमावून बसतात. सायबर भामटे कॉल, चॅटिंग करून विश्वास संपादन करतात. त्यानंतर गोपनीय माहिती जाणून घेत त्याआधारे परस्पर बँक खाते हाताळतात अन् काही क्षणात त्यातील रक्कम गायब करतात. मागील १५ दिवसांत ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे तब्बल २० गुन्हे नोंद झाले आहेत. आश्चर्य म्हणजे सुशिक्षितही भामट्यांच्या जाळ्यात अडकले.
...
लालच बुरी बला !
लॉटरी, बक्षिसांचे आमिष दाखविणारे फोन कॉल्स आल्यावर नागरिक हुरळून जातात. त्यानंतर भामटे गोड बोलून प्रोसेसिंग शुल्क व इतर चार्जेसच्या नावाखाली पैसे स्वत:च्या खात्यात जमा करायला लावतात. एकदा का पैसे खात्यात आले की त्यानंतर ते संपर्क तोडतात. झारखंडमधील जामतारा, कोलकाता, नोएडा येथे या सायबर क्राइमचे धागेदोरे आहेत.
...
आकडे बोलतात
वर्ष गुन्हे फसवणूक रक्कम
२०२० ७८ ५८ लाख रुपये
२०२१ ८० ९५ लाख रुपये
....
अशी होते फसवणूक...
१) बीडमध्ये एका निवृत्त प्राचार्यांना मी बँकेतून बोलतोय. केवायसी अपडेट नाही, असा फोन आला. त्यांनी त्याच्याशी गोपनीय माहिती विश्वासाने शेअर केली. मात्र, काही वेळात त्यांच्या खात्यातून ६० हजार रुपये गायब झाले तेव्हा त्यांना धक्का बसला.
२) धारूर येथे ४ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्य दलातील एका जवानाला कुरिअर कंपनीतून बोलत आहे. पार्सल मिळण्यासाठी एएनवायडीईएसके हे ॲप डाऊनलाेड करायला लावले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून सव्वा दोन लाख रुपये लांबविले.
...
अनोळखी व्यक्तींना बँक खात्याविषयी तसेच ओटीपी व इतर गोपनीय माहिती शेअर करू नका, एटीएमचा पिन कोणालाही सांगू नका, एटीएम कोणाकडे हाताळण्यास देऊ नका. बँक, केबीसी किंवा अन्य काही सांगून येणारे कॉल ओळखा व स्वत:ची फसवणूक करून घेऊ नका.
- आर.एस. गायकवाड, पोलीस निरीक्षक सायबर सेल, बीड.
....