शिरूर कासार : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग पसरत असताना उन्हाळी हंगामाने मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाल आहे. यंदा उन्हाळी बाजरीचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना हाती येणार असून, खाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचीही निश्चिंती झाली आहे. हलक्या हाताने हेक्टरी पन्नास क्विंटल बाजरी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुका कृषी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ४,५१६ हेक्टरवर उन्हाळी हंगाम घेण्यात आल. त्यात २,४३९ हेक्टरवर बाजरीचा पेरा आहे. पोषक वातावरण व वेळीच पाणी, खत मिळाल्याने उन्हाळी बाजरीला मोठे टपोरी व चमकदार दाणे भरले गेले. सध्या बाजरी काढणीचे काम जोरात सुरू असून, कणस कापणी केली जात असल्याचे सर्वत्र चित्र दिसत आहे. पिकाकडे पाहिले की गावातील कोरोनाच्या वेदनेचा विसर पडल्याशिवाय राहत नाही, अशी चांगली स्थिती आहे. बाजरीशिवाय शेतात उन्हाळी भुईमूग (१,३३४), मूग (३१८), उडीद (२८७) व तीळ १३८ हेक्टरवर घेतले होते. या सर्व पिकामुळे कडक उन्हाळादेखील हिरवागार दिसून येत होता. शिवाय अन्य ऊस, फळबागा, मका, घास आदी पिके असल्याने शेतशिवारात उन्हाळा नसून, खरीप हंगामाची जाणीव होत होती.
मूग, उडीद, तीळ घरी गेले, तर आता बाजरी काढणीला वेग आला आहे.
अपेक्षेप्रमाणे विक्रमी उत्पादन
हेक्टरी चाळीस क्विंटल बाजरी निघणार असल्याचा जाणकार शेतकऱ्यांचा अंदाज आहे. म्हणजेच अडीच हजार हेक्टरवर किमान एक लाख क्विंटल उन्हाळी बाजरीचे उत्पादन हाती येणार असल्याचे शेतकरी राजू गाडेकर यांनी सांगितले. मात्र, आता भाव अपेक्षेप्रमाणे मिळणार नसल्याची खंतदेखील व्यक्त केली. त्यांची बाजरी काढणी सध्या सुरू आहे.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निकाली
बाजरीबरोबरच जनावरांसाठी पांढरे शुभ्र सरमाड निघत असल्याने जनावरांच्या भुकेचा प्रश्न यावर्षी राहणार नाही. कडबा, मका, मूग, भुईमुगाचा पाला, गव्हाचे, ज्वारीचे, हरभऱ्याचा व तुरीचा भुसादेखील शेतकऱ्यांनी सुरक्षित ठेवला असल्याने चारा मुबलक असल्याचे ठकाराम कदम यांनी सांगितले.
===Photopath===
140521\img20210513164950_14.jpg