केज : राज्य सरकारने दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेश काढून मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा. तसेच आरक्षणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत राज्य सरकारने कोणतीही नोकर भरती करू नये, अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी केज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. केजमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी दुपारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोशांबाजी केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. ईडब्ल्यूएस आरक्षणातून वगळण्यात आले आहे तो पूर्ववत निर्णय ठेवावा. 2020- 21 मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मिळालेल्या सवलती चालू ठेवाव्यात आदी मागण्या यावेळी केल्या.
मराठा आरक्षण मिळविण्याच्या लढ्यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. त्या सर्वांना साक्षी ठेवून हा आंदोलनाचा लढा न्याय मिळेपर्यंत पुढे चालू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले. नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.