अंबाजोगाई : कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच आपल्यावर पुढील उपचार अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात व्हावेत. हिच धारणा रुग्ण व नातेवाईकांची झाली आहे. परिणामी अंबाजोगाईच्या रुग्णालयात गर्दी वाढतच चालली आहे. तर इतर ठिकाणचे डॉक्टर्सही रुग्णांना ‘रेफर टू अंबाजोगाई’ असा शेरा देत इथेच रुग्ण पाठवू लागले आहेत. यामुळे येेथे कोरोना रुग्णांना बेड मिळणे दुरापास्त झाले आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. अंबाजोगाई तालुक्यात तर गेल्या दोन महिन्यापासून दररोजची रुग्णसंख्या तीन अंकी झाली आहे. अजूनही रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद वैद्यकीय महाविद्यालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटर या दोन ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांवर गेल्या वर्षभरापासून उपचार सुरूच आहेत. स्वाराती रुग्णालयात एकाचवेळी ३५० रुग्णांवर उपचार केले जातात. स्वाराती रुग्णालयात गंभीर व अतिगंभीर रुग्णांची सोय करण्यात आली आहे. इथे उपचारासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांचा मोठा कल याच रुग्णालयाकडे असतो. तर गेल्या वर्षी नव्यानेच सुरू झालेल्या लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये ही रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात एकाच वेळी किमान ७०० रुग्णांवर उपचार होतात. त्यामुळे अंबाजोगाईत दररोज एक हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अंबाजोगाई येथे मिळत असलेले चांगले उपचार व सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध असे रुग्णालय अस्तित्वात असल्याने कोरोना झालेल्या रुग्णांना अंबाजोगाईतच उपचार मिळावेत, अशी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असते. त्या इच्छेपोटीच रुग्ण पॉझिटिव्ह निघताच त्याला अंबाजोगाई येथे कसे उपचार मिळतील यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू असतात. परिणामी अंबाजोगाईत परळी, केज, धारूर, माजलगाव, गंगाखेड, कळंब, मुरुड व परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. अगोदरच अंबाजोगाईत दैनंदिन रुग्णांची वाढती संख्या व बाहेरून येणारे रुग्ण यामुळे येथील रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणेही दुरापास्त झाले आहे. गंभीर व अतिगंभीर रुग्णांनाही बेड मिळविण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते.
...
गंभीर रुग्णासच रुग्णालयात आणा
अंबाजोगाईच्या दोन्ही रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रुग्णांना बेड मिळणेही मोठ्या मुश्किलीचे काम झाले आहे. अशा स्थितीत कोरोनाची कमी लक्षणे असतील अशा रुग्णांवर आपल्या गावातील कोविड सेंटरमध्येच उपचार करावेत. रुग्णास काही त्रास नसल्यास तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगीकरणात ठेवण्यात यावे. जर रुग्णास गंभीर लक्षणे जाणवत असतील तर त्यास स्वाराती रुग्णालय अथवा लोखंडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब लोमटे यांनी केले आहे.
....