अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. परीक्षा न घेताच सर्व विध्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद तापडे यांनी केली आहे.
परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी
अंबाजोगाई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध येणाऱ्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. तालुक्याच्या सीमेवर सर्व नाक्यावर पोलीस परजिल्ह्यातून येत असलेल्या वाहनांची तपासणी करीत आहेत.
रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ
अंबाजोगाई : शेतकरी भाजीपाला लागवड करीत असताना रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात, तर भाज्या उगवल्यानंतर कीटकनाशके मोठ्या प्रमाणावर फवारणी केली जातात. याचा मोठा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
बायोगॅस अनुदान मिळते तोकडे
अंबाजोगाई : गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या गॅसवर ग्रामीण भागात बायोगॅस हा पर्याय ठरू शकतो. बहुतांश शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. या शेतकऱ्यांना अनुदान वाढवून बायोगॅस बांधून दिल्यास गॅसची मागणी कमी होईल व वृक्षतोडही रोखली जाईल. यासाठी बायोगॅसला पूर्ण अनुदान द्या, अशी मागणी रिपाइंच्या महिला आघाडीच्या जिल्हा सचिव राणी गायकवाड यांनी केली आहे.
ग्रामीण रस्ते दुरुस्त करा
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. तालुक्यात वर्षभरापूर्वी अनेक ठिकाणचे रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र, झालेल्या मोठ्या पावसामुळे व कंत्राटदारांनी काम करताना रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी आहे.
--------
वाढत्या तापमानाने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. मार्चपासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून, एप्रिलमध्ये तर उन्हाचा त्रास आणखी वाढला. गेल्या काही दिवसांपासून तर भर दुपारी उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले आहेत. मे महिन्याचा उन्हाळा कसा जातो, याची चिंता नागरिकांना आहे.
--------
वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. शनिवारी पुन्हा २३६ रुग्ण कोरोनाबाधित निघाल्याने शहरी व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.
----------