बीड : पत्नीला आणण्यासाठी सासुरवाडीत गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १६ रोजी लोणगाव (ता. माजलगाव) येथे घडली. दरम्यान, मयत तरुणाच्या नातेवाइकांनी सासुरवाडीच्या लोकांनी घातपात केल्याचा आरोप केला असून, ३६ तास उलटूनही शवविच्छेदन झालेले नाही. उमेश दीपक शिंदे (२४, रा. गेवराई), असे मयताचे नाव आहे. लोणगाव (ता. माजलगाव) ही त्याची सासुरवाडी आहे.
पत्नी माहेरी गेल्याने तिला आणण्यासाठी भाऊ कृष्णा व उमेश हे दोघे दुचाकीवरून लोणगावला सकाळी ११ वाजता गेले होते. यावेळी पत्नीने सासरी येण्यास नकार दिला. त्यामुळे कडाक्याचे भांडण झाले. उमेश शिंदे याने विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर त्यास पात्रूड, माजलगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी तपासणी करून दुपारी त्यास मृत घोषित केले. खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केल्याशिवाय उत्तरीय तपासणी करू देणार नाही, असा पवित्रा उमेशच्या नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, दिंद्रूड ठाण्याच्या सहायक निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र लिहून मृतदेह शवागारात ठेवण्याची विनंती केली. १७ रोजी उशिरापर्यंत दिंद्रूड ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.
तथ्य तपासून योग्य ती कारवाई करूदरम्यान, मयत उमेश शिंदेचा भाऊ कृष्णा व मावशी या दोघांनी त्याला विषारी द्रव पाजून संपविल्याचा आरोप केला, तर माहेरच्या मंडळींनी उमेशनेच विष घेतल्याचा दावा केला आहे. तथ्य तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, असे दिंद्रूड ठाण्याच्या सहायक निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी सांगितले.
उमेशचे आई - वडील कारागृहातउमेश शिंदे व त्याच्या सासुरवाडीतील लोक गुन्हेगारीशी संबंधित आहेत. उमेशची आई हैदराबाद येथील कारागृहात, तर वडील औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात आहेत. ते दोघे आल्यानंतरच तक्रार देऊ व त्यानंतरच उत्तरीय तपासणीस परवानगी दिली जाईल, असा पवित्रा उमेशचा भाऊ कृष्णा शिंदे याने घेतला आहे.