अंबाजोगाई : दारू पिण्यास नकार देणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील तरुणास सोबतच्या दोघा जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला दुचाकीला बांधून फरफटत नेऊन शेतात सोडले. ही घटना परळी तालुक्यातील भोपळा शिवारात घडली.
अशोक वैजनाथ चाटे (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे.
१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या गावातील ज्ञानेश्वर किसन साळुंके हा त्यांच्या घरी आला आणि अशोकला दुचाकीवर बसवून घेऊन गेला. त्यानंतर रात्री दीड वाजता ज्ञानेश्वर साळुंके आणि मारोती हनुमंत चाटे हे दोघे त्याला भोपला शिवारातील विसावा धाब्यावर घेऊन गेले. तिथे दारू का पित नाहीस असे म्हणत त्या दोघांनी अशोकला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर अशोकचे पाय दुचाकीला बांधून त्याला फरफटत नेले आणि वरवटी शिवारातील शेतात सोडून दिले. तेथून अज्ञात व्यक्तीला कॉल करून त्यांनी 'कार्यक्रम झाला' असा संदेश दिला. दरम्यान, जखमी अशोकला पाहून ग्रामस्थांनी त्याबद्दल त्याच्या आई-वडिलांना माहिती दिली. शुद्धीवर आल्यानंतर अशोकने झालेला घटनाक्रम आई-वडिलांना सांगितला. सध्या अशोकवर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अशोकची आई लक्ष्मी यांच्या फिर्यादीनुसारज्ञानेश्वर साळुंके आणि मारोती चाटे या दोघांवर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आला.