लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या बाजूने असलेल्या ६१ गाळाधारकांकडे जवळपास दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. वारंवार नोटिसा देऊनही त्यांनी थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आता हे चालणार नाही. थकबाकी न भरल्यास गाळ्यांना सील ठोकून गुन्हे दाखल करावेत, असे आदेश राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीडच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांना दिले. यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यासही त्यांनी सांगितले.
राज्याचे क्रीडा आयुक्त केंद्रेकर हे गुरुवारी बीड येथे आले होते. सुरूवातीला त्यांनी कार्यालयीन कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संकुलाच्या गाळाधारकांकडे थकलेल्या भाड्याच्या रकमेबाबत विचारणा केली. संकुलाच्या बाजूने असलेल्या ६१ गाळाधारकांकडे तब्बल दीड कोटी रूपयांची थकबाकी असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ही थकबाकी मागील अनेक वर्षांपासून भरलेलीच नाही. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून याबाबत वारंवार नोटिसा देण्यात आल्या. परंतु गाळाधारकांनी याकडे दुर्लक्ष केले. हीच माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी आयुक्तांना सांगितली.
यावेळी केंद्रेकर यांनी गाळेधारकांची बैठक घेऊन त्यांना दोन दिवसांत भाडे भरण्यास मुदत द्यावी, यासंदर्भात आदेश दिले. तसेच जे गाळाधारक भाडे देणार नाहीत, त्यांच्या गाळ्यांना सील ठोकून गुन्हे नोंदवा, असा आदेशही केंद्रेकर यांनी खुरपुडे यांना दिला. या आदेशामुळे थकबाकी ठेवणाºया गाळाधारकांचे धाबे दणाणले आहेत.गाळाधारकांची तातडीची बैठकआयुक्त केंद्रेकर यांनी आदेश देताच जिल्हा क्रीडा अधिकाºयांनी गाळाधारकांची दुपारी साडेतीन वाजता तातडीची बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी तात्काळ थकबाकी भरण्याचे सांगितले.यावर गाळाधारकांनी नियमित भाड्यासह प्रती महिना पाच हजार अशी थकबाकी भरू, असे सांगितले. परंतु असे करता येत नाही. संपूर्णच थकबाकी भरावी लागेल, असे खुरपुडे यांनी सांगितले. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. गाळेधारकांकडे जवळपास अडीच लाखांपर्यंत बाकी आहेगाळाधारकांचे म्हणणे जिल्हाधिकारी यांच्यापुढे मांडणार आहोत. त्यांच्या आदेशानुसार तात्काळ गाळे सील करून गुन्हे नोंदविणार असल्याचे खुरपुडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.