माजलगाव : माजलगाव नगर परिषदेत पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ असा कारभार सुरू असून दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झालेल्या व्यक्तीची चितेची आग विझण्यापूर्वी त्याची कोट्यवधी रुपये किमतीची मालमत्ता हडपण्याचा डाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून साधण्यात आला. मालमत्तेवर नाव लावण्याच्या फेर ओढण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या जाहीर प्रगटनाची १५ दिवसांची मुदत पूर्ण होण्याआधीच अवघ्या १० दिवसांत मयताच्या व पुतण्याच्या नावावर मालमत्ता केल्याचा प्रताप येथील नगर परिषदेने केला असून मुदतीत घेण्यात आलेल्या आक्षेपावर कसलीही सुनावणी घेण्यात आली नाही.
येथील जुना मोंढा भागात राजाराम धोंडीराम जोगडे यांचा मालमत्ता क्र.१०-११८/६ नुसार पाच दुकाने असलेली कोट्यवधी रुपये किमतीची तर दुसरी मोंढ्यातील दूध डेअरीजवळ जागा आहे. जोगडे यांचे २४ मे रोजी निधन झाले. त्यांना पत्नी, मुलेबाळे कोणीच नसल्याने त्यांनी रजिस्टर्ड मृत्युपत्र भाऊ निवृत्ती जोगडे यांच्या नावावर केले होते. मात्र राजाराम यांच्या मृत्यूनंतर निवृत्ती यांचेदेखील अवघ्या पाच दिवसांनी २९ मे रोजी निधन झाले. निवृत्ती यांना पत्नी व विवाहित मुली आहेत.
राजाराम यांचे २४ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर रात्री १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर व मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापूर्वीच २५ जून रोजी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळालेले नसतानाही मालमत्तेवर मृत्युपत्राधारे मयत झालेल्या निवृत्तींचे नाव लावण्यात यावे, असा अर्ज नगर परिषदेत दाखल करून घेण्यात आल्याचा आरोप विष्णू जोगडे यांनी केला आहे.
त्यानंतर ७ जुलै रोजी नगर परिषदेच्या वतीने वृत्तपत्रात जाहीर प्रगटन देऊन १५ दिवसांत हरकत मागवली. त्यावर बाळासाहेब उर्फ विष्णू जोगडे यांनी १४ जुलै रोजी हरकत दाखल केली. त्यावर नियमानुसार सुनावणी होणे अपेक्षित असताना त्यास नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी चक्क फाटा देण्याचे काम केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
या जागेबाबत तक्रार असताना व हरकतीचे १५ दिवस २१ जुलै रोजी पूर्ण होण्यापूर्वीच १२ जुलै रोजीच मालमत्तेवर मयत निवृत्ती जोगडे व दुसऱ्या मालमत्तेवर सुभाष आत्माराम जोगडे यांचे नाव लावण्यात आले असल्याचा आरोप विष्णू जोगडे यांनी केला आहे.
------
येथील नगर परिषदेत मयताचे मृत्यू प्रमाणपत्र नसताना अर्ज कसा दाखल करून घेण्यात आला, आक्षेप अर्जावर सुनावणी का घेतली नाही, प्रगटनाचे १५ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच नाव कसे लावण्यात आले, हे मोठे गौडबंगाल असून ही प्रक्रिया त्वरित रद्द करून न्याय न दिल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू. त्यास सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार असतील. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करणार आहे. - बाळासाहेब उर्फ विष्णू जोगडे, तक्रारदार
-----
नाव लावण्यासाठी अर्ज आला होता व रजिस्टर्ड मृत्युपत्र असल्याने नाव लावण्यात आले. विष्णू जोगडे यांनी याविरोधात तक्रार दिली होती. परंतु त्यांनी त्या तक्रारीसोबत कसल्याही प्रकारची कागदपत्रे न जोडल्याने आम्ही सुनावणी घेतली नाही.
- विशाल भोसले, मुख्याधिकारी, नगर परिषद, माजलगाव