बीड : अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोरोना लस बुधवारी बीडमध्ये दाखल झाली. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १७ हजार ६४० डोस प्राप्त झाले आहेत. ही लस घेण्यासाठी जिल्ह्यातील १४ हजार ६०९ आरोग्य सेवकांनी नोंदणी केली आहे; परंतु पहिल्या टप्प्यात ८ हजार ८२० सेवकांनाच लस मिळणार आहे. त्यामुळे प्राधान्य कोणाला द्यायचे, हा प्रश्न आरोग्य विभागासमोर आहे.
आरोग्य विभागातील अंगणवाडी सेविका ते डॉक्टरपर्यंत सर्वांनीच कोरोनाकाळात सर्वांत पुढे होऊन लढा दिला. त्यामुळे कोरोना लस देण्यासाठी त्यांना प्राधान्य देण्यात आले. ही लस कधी मिळणार, याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अखेर बुधवारी दुपारी कोविशिल्ड लस घेऊन एक वातानुकूलित वाहन बीडला आले. आरोग्य विभागाने तात्काळ लसगृहात तिची साठवणूक केली. दुपारच्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, डॉ. संजय कदम, डॉ. बाबासाहेब ढाकणे यांनी त्याची पाहणी केली.
दरम्यान, जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १७ हजार ६४० डोस मिळाले आहेत. एका सेवकाला पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे आलेली लस केवळ ८ हजार ८२० जणांनाच मिळणार आहे. इतरांना दुसऱ्या टप्प्यात दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरा टप्पा कधी सुरू होणार, याचीही माहिती आरोग्य विभागाला नाही. असे असले तरी आलेले डोस प्राधान्याने कोणाला द्यायचे, हे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
या ठिकाणी लसीकरणाची सुविधा
पहिल्यांदा १४ ठिकाणी लसीकरण करण्याच्या सूचना होत्या. नंतर ९ ठिकाणी करण्यास सांगितले. बुधवारी त्यात आणखी कमी करून हा आकडा सहावर आणण्यात आला आहे. यात अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय, जिल्हा रुग्णालय बीड, परळी उपजिल्हा रुग्णालय, गेवराई उपजिल्हा रुग्णालय, केज उपजिल्हा रुग्णालय, आष्टी ग्रामीण रुग्णालय, अशा सहा ठिकाणी लसीकरण होईल. यापूर्वी बीड, परळी व वडवणीत ड्राय रन घेण्यात आला होता. यात यश मिळाले होते.
कोट
आतापर्यंत १४,६०९ आरोग्य सेवकांची पोर्टलवर नोंदणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात १७,६४० डोस बीडला आले आहेत. ६ ठिकाणी लसीकरण होणार असून, एका बुथवर रोज १०० जणांना लस दिली जाईल. दुसरा टप्पा येताच उर्वरित लाभार्थ्यांना लस दिली जाईल. प्राधान्य देण्यासाठी नियोजन केले जात आहे.
डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
अशी आहे आकडेवारी
लसीचे डोस प्राप्त - १७,६४०
पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार - ८८२०
लस साठवण क्षमता - ३६८ लिटर
ठिकाणी होणार लसीकरण - ६
पोर्टलवरील नोंदणी - १४,६०९
लसीकरण मोहीम - १६ जानेवारी
एका बुथवर दररोज १०० लाभार्थ्यांना मिळेल लस