गेवराई : शहरातील संजय नगर भागातील रहिवासी व कामानिमित्ताने पुणे येथे गेलेल्या कुटूंबातील विवाहितेने वाघोली (पुणे) येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र तिने सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली, असे म्हणत माहेरच्या लोकांनी अंत्यविधी रोखला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तही वाढविला. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमित नेल्यावर नातेवाईकांनी दगडफेक केली. यामध्ये पती व दीर असे दोघे जखमी झाले होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
रेखा संभाजी पवार (२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. संभाजी पवार हे कामासाठी पुण्याला गेले होते. मंगळवारी राहत्या घरीच रेखाने गळफास घेतला. त्यानंतर उत्तरीय तपासणी करून रेखाचा मृतदेह गेवराई येथे आणण्यात आला. यावेळी रेखाच्या माहेरकडील लोकांचीही मोठी उपस्थिती होती. रेखाने सासरच्या जाचास कंटाळूनच आत्महत्या केली, असे म्हणत अंत्यसंस्कार रोखले. यात पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक तयार झाले. मृतदेह सिदंखेड रोडवरील वडार समाजाच्या स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात नेला व अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्कार करून नागरीक परतताना अचानक काही लोकांनी रेखाचा पती संभाजी पवार, दीर साईनाथ पवार यांच्या दिशेने दगड भिरकावले. त्यामुळे सर्वांचीच पळापळ सुरू झाली. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने प्रकरण निवळले. अद्याप या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.