लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : पिसाळलेल्या कुत्र्याने एका महिलेचा चावा घेतला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी नेताना नातेवाइकांना पुराच्या पाण्यात जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागली, हा प्रकारही रविवारी गेवराई तालुक्यातील मारोतीचीवाडी-उमापूर रस्त्यावरील अमृता नदीवर घडला.
मारोतीचीवाडी येथील शारदा वसंत पाटोळे (वय ४५) या महिलेवर सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये शारदा पाटोळे यांचा एक पाय कुत्र्याने अक्षरशः फोडून काढल्याने मोठा रक्तस्त्राव होऊ लागला. यानंतर, जखमी शारदा पाटोळे यांना नातेवाईक उपचारासाठी उमापूर येथे घेऊन जात असताना, रस्त्याअभावी त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यावेळी जिवाची पर्वा न करता नातेवाइकांनी जखमी शारदा पाटोळे यांना उचलून पुराच्या पाण्यातून नदी पार केली. दरम्यान, नदी पार केल्यानंतर जखमी शारदा पाटोळे यांना एका वाहनातून उमापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी बीड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
...
रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर
भोजगाव येथील सुदर्शन संत हा तरुण अमृता नदीच्या पुलाच्या कठड्यावरून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारीच ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वीच भोजगाव येथेच शवविच्छेदनासाठी एका मुलीचा मृतदेह नातेवाइकांना चक्क खांद्यावर उचलून नदी पार करावी लागली होती. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने गेवराई तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
....
260921\img-20210926-wa0185_14.jpg
जखमी महिलेला उपचारासाठी नेताना नातेवाईकांची कसरत