अंबाजोगाई :
अंबाजोगाई येथील कोविड सेंटरमधील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेने २७ मार्च रोजी तीन कोविड सेंटरमध्ये नवीन ४०० खाटांना व १९२ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेचे प्रमुख तथा बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी हे आदेश काढले आहेत.
अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) वृद्धत्व आजार व उपचार केंद्रात नव्याने १०० खाटांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी भूलतज्ज्ञ (ऑनकॉल) २, वैद्यकीय अधिकारी ४, सराफ नर्स १२, औषध निरीक्षक १, डीईओ १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ आणि वॉर्ड बॉय ८ अशी एकूण २९ नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या डेडककेटेड कोविड हॉस्पिटलला नवीन २०० खाटांना व १३४ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये भिषक २, भूलतज्ज्ञ २, वैद्यकीय अधिकारी १२, स्टाफ नर्स ५०, औषध निरीक्षक ३, डीईओ २, प्रयोगशाळा तंत्रज्ञ २, वॉर्ड बॉय ५०, क्ष-किरण तंत्रज्ञ ३, इलेक्ट्रेशियन १, प्लंबर १, ऑक्सिजन सिलिंडर सहायक ६ अशा एकूण १३४ नवीन पदांना मान्यता दिली आहे.
शहरातील समाज कल्याण वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये १०० खाटांना व २९ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी १, आयुष वैद्यकीय अधिकारी ३, स्टाफ नर्स १२, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, डीईओ १, आणि वॉर्ड बॉय ५ अशा २९ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
ही सर्व पदे भरताना कुठल्याही परिस्थितीमध्ये अनावश्यक मनुष्यबळ राहणार नाही, याची काळजी घ्यावी. तसे निदर्शनास आल्यास संबंधितांवर योग्य ती प्रशासनीय कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सदरील मंजूर पदे भरताना यापूर्वी कमी करण्यात आलेल्या ज्येष्ठता यादीनुसार पुनर्नियुक्ती देण्यात यावी, रुग्ण संख्या कमी झाली की लगेच मनुष्यबळ कमी करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.