माजलगाव ( जि. बीड ) : गंभीर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शन मागणी नोंदविल्यानंतर १० दिवसांनी मिळत असल्याने मोठी अडचण होत आहे. दरम्यान, या कालावधीत रुग्ण बरा होऊन घरी गेला किंवा अन्य ठिकाणी त्याला उपराचार्थ हलविण्यात आले अथवा एखाद्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याच्या नावे मागविलेले रेमडेसिविर जाते कुठे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा उपयोग सध्या महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे, तर दुसरीकडे शासकीय पुरवठा मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. तहसील कार्यालयात रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शनची मागणी नोंदवावी लागते. त्यानंतर वेटिंग लिस्ट लागते व त्याप्रमाणे इंजेक्शन मिळते, अशी परिस्थिती आहे. रुग्णास इंजेक्शन द्यावे लागणार, असे सांगताच इंजेक्शन नोंदणी केली जाते. मात्र, तब्बल दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. वेळेवर ते उपलब्ध होत नाही. मोठ्या संख्यने बाधित बरे होऊन घरी परतले, काहींना अन्य ठिकाणी हलविले असेल आणि दहा दिवसांनी नोंदणी केलेले इंजेक्शन मिळत असतील तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्न बाधितांच्या नातेवाइकांतून उपस्थित केला जात आहे. माजलगाव तहसील कार्यालयात २३ एप्रिलपासून १२ मेपर्यंत ९५४ रुग्णांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून २ मेपर्यंत नोंदणी केलेल्यांचेच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. १२ मेपर्यंत केवळ ३२९ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले.
रेमडेसिविर इंजेक्शन जातात कुठे?नोंदणी केलेले रेमडेसिविर इंजेक्शन १० दिवसांनंतर उपलब्ध होत आहे. तोपर्यंत संबंधित रुग्ण दगावतो किंवा रेफर केला जातो किंवा सुटी मिळाल्यानंतर घरी जातो. मात्र, अशा रुग्णांसाठी नोंदणी केलेले इंजेक्शन आल्यानंतर त्यांना दिले जात नाही, किंवा जिल्हा आरोग्य विभागाकडे त्या नावाचे इंजेक्शन परत जमादेखील केलेले नाहीत. मग हे इंजेक्शन जातात कुठे, याचीदेखील चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत रुग्णांच्या नातेवाइकांतून व्यक्त होत आहे.
आम्ही इंजेक्शन नोंदणीची माहिती आरोग्य विभागास पाठवतो. त्यास मंजुरी मिळून ते ग्रामीण रुग्णालयात पाठवले जाते. रुग्ण मृत्यूनंतर किंवा रुग्ण डिस्चार्ज-रेफर झाल्यावर त्याच्या नावाचे शिल्लक इंजेक्शन परत आरोग्य खात्याकडे पाठवायला पाहिजे, असा शासनाचा आदेश आहे.- वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव.
रेमडेसिविर इंजेक्शन वरूनच कमी येत आहेत. त्यामुळे आम्हाला वाटपात अडचणी येत आहेत. शिल्लक इंजेक्शन वेटिंग लिस्टप्रमाणे रुग्णांना देण्यात येतात.- डॉ. सुरेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव.