वडवणी : रुग्णसेवा ही सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. कोविड संकट काळात रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आधार देण्यासाठी व वेळेवर उपचारासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. रुग्णसेवेत पाप कराल तर याद राखा, असा सूचक इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश साबळे यांनी चिंचवण ग्रामीण रुग्णालयात भेटी दरम्यान दिला.
डोंगरपट्ट्यातील केंद्रबिंदू असलेल्या चिंचवण ग्रामीण रुग्णालयामधील कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका सतत गैरहजर राहत असल्यामुळे वेळोवेळी ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. तक्रारींचा आढावा घेत बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक भेट देऊन ग्रामीण रुग्णालयाची झाडाझडती घेतली. याप्रसंगी गैरहजर व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत कर्तव्यात कसूर केल्यास गय केली जाणार नाही असा इशारा दिला. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केली. याप्रसंगी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अबेद शेख, बहुजन विकास मोर्चाचे अमोल पोळ, युवानेते योगेश मात्रे, रानोजी डोंगरे, माजी उपसरपंच मदन नेटकेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णांची चौकशी, कर्मचाऱ्यांना तंबी
यावेळी ग्रामीण रुग्णालयामध्ये असलेल्या रुग्णांची स्वतः तपासणी करून त्या रुग्णांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. तसेच या ठिकाणी ओपीडी कमी होत असल्याबाबत कर्मचारी व डॉक्टरांना तंबी देत विचारणा केली. ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी. कसल्याही प्रकारची घाण दिसणार नाही याची दक्षता घ्या. रुग्णालये सर्वसामान्यांच्या रुग्णसेवेसाठी आहेत, असेही ते म्हणाले.
230821\img-20210823-wa0013.jpg
चिचंवण ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ सुरेश साबण यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली व रूग्णांची गैरसोय, स्वच्छता याबाबत आढावा घेऊन सुचना दिल्या.