बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध महापुरुषांविषयी कथित वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी १२ डिसेंबरला जिल्हा बंदची हाक दिली आहे. शहरात विविध पक्ष-संघटनांनी मोर्चाला पाठिंबा असून, खासगी शाळा-महाविद्यालये बंद आहेत. काळ्या फिती लावून निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला आहे. यात शिवप्रेमींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद जिल्ह्यात उमटले. सर्वपक्षीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन ७ डिसेंबरला जिल्हा बंदची हाक दिली होती. यात आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. बीडसह सर्व तालुक्यांच्या ठिकाणी व मोठ्या बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. राज्यपाल कोश्यारींपाठोपाठ चंद्रकांत पाटील, सुधांशू त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लोढा यांच्या विधानांवरही आक्षेप घेतला गेला. या सर्वांना पदमुक्त करावे, या मागणीसाठी शहरात सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चेकरी काळ्या फिती लावून सहभागी झाले होते. प्रमुख मार्गावरून मूक माेर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
मोर्चा मूक, पण भावना बोलक्यामोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. महिलांसह तरुणांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चा मूक असल्याने घोषणा नव्हत्या, पण भावना तीव्र होत्या. हातात भगवे झेंडे घेऊन व काळ्या फिती लावून सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. कोठेही गडबड, गोंधळ होणार नाही, यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.