बीड : युपीआयद्वारे एका ग्राहकाच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून फसवणूक केल्याची तक्रार बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
छंदर महादेव तांबडे (रा. स्वराज्यनगर, बीड) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांची माहिती अशी की, तांबडे हे नेहमी आपल्या खात्यातून युपीआयव्दारे पैसे काढत; परंतु १८ एप्रिलला त्यांंनी बँकेतून पासबुकवर एन्ट्री मारून घेतली. यावेळी त्यांच्या खात्यातून १ लाख ५४ हजार १९१ रुपये गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांंनी याबाबत तातडीने बँकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क केला. यासंदर्भात विचारपूस केली. मात्र, याबद्दल त्यांना अधिक माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर छंदर तांबडे यांनी यासंदर्भात फसवणूक झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेे. याप्रकरणाचा पुढील तपास ठाणेप्रमुख साईनाथ ठोंबरे हे करत आहेत. दरम्यान, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यासंदर्भात फोनद्वारे कोणालाही बँक खात्यासंदर्भात माहिती देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.