बीड : जिल्ह्यातील पारंपारिक राजकीय मक्तेदारी, घराणेशाहीचा शिवसेना ताकदीने विरोध करणार असून अन्याय, हुकूमशाही विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन मुकाबला करणार असल्याचे शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळूक यांनी स्पष्ट केले. रविवारी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहसंपर्कप्रमुख सुनिल धांडे, चंद्रकांत नवले, बाळासाहेब पिंगळे, विलास महाराज शिंदे, भारत जगताप, बाळासाहेब अंबुरे आदी उपस्थित होते.
या वेळी सचिन मुळूक म्हणाले, सध्या विकासाची नौटंकी सुरु आहे. कोट्यावधींचा निधी कागदावरच आहे, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहर कचरा डेपो झालाय, दोन्ही क्षीरसागरांच्या भांडणात बीडकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे ते म्हणाले. ग्रामीण शिवसैनिक शिवसेनेशी एकनिष्ठ असून पक्षप्रमुखांनी दिलेली पक्षवाढीची जबाबदारी यशस्वी पार पाडू अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्वांच्या संमतीने, विचारात घेऊन व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुखपदाच्या निवडी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुका सर्व सहा मतदार संघात शिवसेना स्वतंत्र लढणार असून तीन मतदार संघात भगवा फडकावणारच असा विश्वास खांडे, मुळूक यांनी व्यक्त केला. वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेचा मुद्दा पुढे करत अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे व ही बाब पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना कळविणार आहे. तर विरोधी पक्ष नेत्यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्टंटबाजी केल्याचा आरोप मुळूक यांनी केला.
‘मातोश्री’चा निर्णय प्रमाण - बाळासाहेब पिंगळेबदल अटळ असतात, मातोश्रीचा निर्णय प्रमाण आहे. या पलिकडे जाऊ शकत नाही. असे स्पष्टीकरण देत मावळते जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी भूमिका स्पष्ट केली. पक्षप्रमुखांनी विश्वास दाखविला, शिवसेनेमुळे पदप्रतिष्ठा मिळाल्याचे ते म्हणाले. ज्या निष्ठेने १३ वर्ष काम केले, तसेच उद्याही काम करणार असून मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढविणार असल्याचे पिंगळे म्हणाले. आगामी निवडणुकीत आपल्याला संधी मिळावी म्हणून पक्षप्रमुखांना भेटून विनंती करणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.