स्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी
अंबाजोगाई : शहरातील बसस्थानकात गत काही दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. तसेच काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले दिसत आहे. गोळा करून ठेवलेला कचरा वाऱ्याने अस्ताव्यस्त उडत आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. बसस्थानक प्रमुखांनी याची दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
रस्त्यावरील हातगाडे वाहतुकीला अडथळे
अंबाजोगाई : शहरातील बाजारपेठ भागात रस्त्याच्या कडेलाच हातगाडे उभे केले जात आहेत. त्यामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. बसस्थानक परिसर, मंडीबाजार, शिवाजी चौक, मोंढा परिसर या भागात मोठ्या प्रमाणात हातगाडे उभे केले जात असून, वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने हे अडथळे दूर करावेत, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
रस्त्यावरच होतेय भाजीपाल्याची विक्री
बीड : शहरातील रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने नागरिकांना पायी ये -जा करण्यासाठी मोकळी जागा सोडण्यात आली आहे. या पादचारी पथावर फळे व भाजीपाला विक्री करणारे हातगाडे थांबत आहेत. तसेच याठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे नागरिकांना पादचारी पथाने ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे.
फ्यूज कॉल सेंटरचे क्रमांक बंदच
अंबाजोगाई : शहरातील योगेश्वरी फिडर, मांडवा फिडर व अन्य काही फ्यूज कॉल सेंटरवरील कर्मचाऱ्यांचे फोन क्रमांक लागत नाहीत. विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांची गैरसोय होते. अनेकदा नागरिक वीजपुरवठ्याबाबत तक्रार करण्यासाठी फोन करतात. परंतु, तेथील फोन लागत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरण्याची मागणी
बीड : राज्यातील जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंत्यांची दीड हजार पदे रिक्त आहेत. अनेक जण सेवानिवृत्त झाल्याने या जागा रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अभियंत्यांच्या जागा भरलेल्या नाहीत. सध्या असलेल्या अभियंत्यांवर कामाचा ताण वाढला आहे. तरी या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी होत आहे. जेणेकरून नवीन अभियंत्यांनाही नोकऱ्या मिळण्यास मदत होईल. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली जात आहे.
सौताडा घाटरस्ता दुरुस्तीची मागणी
पाटोदा : नगर - बीड रस्त्यावरील सौताडा घाटातील रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केलेले नाही. सध्या घाटातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. घाटवळणावर रस्त्याला डांबरच राहिलेले नाही. येथे खडीमय रस्ता झाला आहे. या रस्त्यावर अनेक दुचाकीस्वारांना अपघात होत आहेत. वळणाच्या जागेवरचे कठडेदेखील तुटले आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. परंतु अद्याप या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे.