अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : महाविकास आघाडीने नवीन जिल्हा निर्मितीची यादी प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित यादीत अंबाजोगाईला स्थान न मिळाल्याने जिल्हा निर्मितीच्या मागणीला पुन्हा खो बसला आहे. शासनाकडून सातत्याने अंबाजोगाईकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम वर्षानुवर्ष सुरु आहे.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी मागील ३५ वर्षांपासून शासन दरबारी आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने जनआंदोलनाचा रेटा विविध माध्यमातून सुरुच आहे. जिल्हा निर्मितीला पूरक असणारी सर्व कार्यालये अंबाजोगाईत सज्ज आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, भूसंपादनाची तीन कार्यालये अशी शासकीय यंत्रणा स्वतंत्र व अद्ययावत इमारतीत सज्ज आहे. तरीही अंबाजोगाईकरांना सातत्याने डावलले जाते. दिवंगत माजीमंत्री डॉ. विमल मुंदडा यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असणारी सर्वच कार्यालये अंबाजोगाईत कार्यान्वित केली. नवीन अत्यावश्यक असणाऱ्या कार्यालयासाठी शासकीय जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती झाल्यास अत्यंत कमी खर्चात कार्यान्वित होऊ शकतो याचे अहवाल विभागीय आयुक्तांनी अनेकवेळा वरिष्ठ प्रशासनाला पाठवलेले आहेत. गेल्या बारा वर्षांपासून अंबाजोगाईत सर्व कार्यालये सुरु झालेली आहेत. अशी सर्व सकारात्मक स्थिती असतानाही अंबाजोगाईला जिल्हा निर्मितीबाबत वारंवार डावलले जाते, हे नित्याचे ठरले आहे.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी गेल्या ३५ वर्षात हिंसक आंदोलनासह शांततामय तथा लोकशाही मार्गाने आंदोलने सुरुच आहेत. आजतागायत सह मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिले आहेत. (कै. सुधाकरराव नाईक, शरद पवार, मनोहर जोशी, कै.विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस) तरीही अंबाजोगाईकरांची मागणी पूर्ण झालेली नाही. ज्या ज्या वेळी विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला की अंबाजोगाई जिल्हा निर्मिती हा मुद्दा कळीचा ठरतो. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जिल्हा निर्मितीच्या प्रश्नावर सोयीचे राजकारण केलेले आहे. निवडणुका संपल्या की हा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहतो. केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न रखडत पडला आहे. महाविकास आघाडीने नवीन प्रस्तावित जिल्ह्यांची यादी जाहीर केली. त्या प्रस्तावित यादीत अंबाजोगाईला स्थान न मिळाल्याने अंबाजोगाईकरांची घोर निराशा झाली आहे.दोन पिढ्यांचा लढा, नाही सुटला तिढाअंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी सातत्याने सर्वपक्षीय आंदोलन झाले. राजकारण बाजुला ठेवून जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी अंबाजोगाईकरांचा लढा सुरुच आहे. कै. डॉ. द्वारकादास लोहिया, कै. डॉ. विमल मुंदडा, कै. अरुण पुजारी, अमर हबीब, अशोक गुंजाळ, प्रा. नानासाहेब गाठाळ, कॉ. काशीनाथ कापसे, कै. संभाजीराव जोगदंड यांच्यासह अनेकांच्या पहिल्या फळीने तर नंदकिशोर मुंदडा, राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख, बबन लोमटे, विद्यमान आ. संजय दौंड यांच्या दुसºया फळीनेही जिल्हा निर्मितीचा प्रश्न साततत्याने तेवत ठेवला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईकरांचा लढा विविध माध्यमातून सुरुच आहे. मात्र हा तिढा सुटता सुटेना.
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीला पुन्हा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:57 PM
अविनाश मुडेगावकर । लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : महाविकास आघाडीने नवीन जिल्हा निर्मितीची यादी प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित ...
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा प्रभाव नाही : जिल्ह्यासाठी पूरक कार्यालये असूनही प्रस्ताव नाही