बीड : या प्रभागातील काम सोडून माझ्या प्रभागात काम कर, असे म्हणत बीड पालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचाऱ्याला नगरसेविका पतीने काठीने मारहाण केली. यात कर्मचाऱ्याचे डोके फुटल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. बीड शहरातील नगर रोडवर मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या प्रकाराने पालिकेतील दडपशाही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
बीड पालिकेच्या विद्यूत विभागाकडून शहरातील विद्यूत पोल, तारा, पथदिवे आदी दुरूस्ती, देखभालीचे कामे होत आहेत. मंगळवारी दुपारी पालिका कर्मचारी दत्ता व्यवहारे हे इतर कर्मचाऱ्यांसह नगर रोड वरील प्रभाग क्रमांक १३ मध्ये गेले. तेथे काम सुरू असतानाच दुसऱ्या एका गटातील व प्रभागातील नगरसेवक पती कार्यकर्त्यांसह तेथे आले. माझ्या प्रभागातील काम का करीत नाहीस, असे म्हणत व्यवहारे यांना शिवीगाळ केली. वाद वाढून नगरसेवक पतीने व्यवहारे यांना चापट मारली. नंतर सोबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काठीने मारहाण केली. यात त्यांचे डोके फुटले आहे. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांकडून कामात दुजाभावबीड पालिकेत नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर व उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांचे वेगवेगळे दोन गट आहेत. दोघांचेही नगरसेवक, कार्यकर्ते कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेण्यास येतात. परंतु, अनेकदा कर्मचाऱ्यांकडून सत्ताधाऱ्यांना झुकते माप देत कामे केली जात आहेत. यात दुजाभाव होत असल्याचे यापूर्वी दिसून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामात सातत्य ठेवणे व दुजाभाव न करणे गरजेचे आहे. यामुळे वाद होणार नाहीत.
नगर रोडवर विजेच्या दुरूस्तीचे काम करीत असताना कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचे समजले आहे. त्याला उपचार घेऊन योग्य ती तक्रार देण्यास सांगितले आहे. यात नेमके काय झाले, याची चौकशी केली जाईल.- डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद बीड
नगर पालिकेतील कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे. त्याला मार असल्याने रुग्णालयात पाठविले आहे. उपचार घेऊन परत येताच त्याच्या तक्रारीनुसार योग्य तो गुन्हा दाखल केला जाईल. - सुनील बिर्ला, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे शिवाजीनगर, बीड