बीड, दि. १४ : शहरातील अण्णाभाऊ साठे चौक व्यापा-यांच्या विनंतीवरुन शनिवारी सकाळी आठ वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे दिवाळीत वाहनधारकांचे हाल थांबणार आहेत. हा चौक १९ आॅक्टोबरपर्यंत खुला ठेवला जाणार आहे. त्यानंतर चौक बंदकरून वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.
शहरातील वाढत्या अपघातामुळे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील अण्णा भाऊ साठे चौक मागील दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यानंतर अपघात नियंत्रणात आले होते. मात्र, दिवाळी व इतर सणात हा चौक बंद असल्याने व्यापारावर परिणाम होणा-याबरोबरच सर्वसामान्यांना दूरवरुन जावे लागत असे. त्यामुळे त्यांचा वेळ व खर्च होऊन त्रास होत असे. हाच धागा पकडून व्यापा-यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांची भेट घेतली. रितसर त्यांच्याकडे निवेदन सादर करुन दिवाळीत काही दिवस हा चौक खुला करण्याची विनंती केली. पोलीस अधिका-यांनी यावर चर्चा करुन १४ ते १९ आॅक्टोबर रात्री १० वाजेपर्यंत चौक खुला ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या निर्णयाचे व्यापा-यांमधून याचे स्वागत होत आहे, तर अनेकांनी यावर टीकास्त्र सोडले आहे.शहराबाहेरुन अवजड वाहतूक
महामार्गावरील वळण रस्त्यावरुन एकेरी वाहतूक झाल्यामुळे अवजड वाहने शहराबाहेरुन जात आहेत. त्यामुळे हा चौक खुला केल्याचा फायदा आहे. छोट्या मोठ्या वाहन धारकांना नियमात वाहने चालवून अपघात होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन बीड पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
साठे चौकात कर्मचारी नियुक्त व्यापा-यांच्या विनंतीवरुन व वरिष्ठांच्या आदेशावरुन हा चौक वाहतुकीसाठी खुला केला आहे. ठराविक कालावधीनंतर हा चौक बंद केला जाईल. या ठिकाणी स्वतंत्र कर्मचारी नेमले आहेत. वाहनधारकांनी काळजी घेऊन सहकार्य करावे.- दिनेश आहेर, वाहतूक शाखा, बीड