शहरातील बायपास रोडवर असलेल्या मंगलनाथ कॉलनीमध्ये पूर्णपणे रहिवासी परिसरामध्ये काही दुकानांचे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले असून तेथे कोविड सेंटर सुरू करण्याचा काही लोकांनी घाट घातला आहे. कोविड पेशंटसाठी भेटण्यास येणाऱ्या लोकांसाठी तेथे कोठेही जागा नाही व ते रहिवाशांच्या घरासमोर थांबतील जेणे करून कोविडचा प्रसार जास्त होईल तसेच जी जागा कोविड सेंटरला देण्यात येणार आहे. तेथे कोठेही सेफ्टी टँक अथवा संडास, बाथरूमची व्यवस्था नाही याचाच अर्थ तेथील सर्व लोक उघड्यावर शौचास व लघवीस जातील जेणे करून सर्व परिसर हा अस्वच्छ होईल. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच बाजूस नगर परिषदेचे उद्यान आहे, जेथे छोटी मुले व वयस्कर लोक जात असतात. तसेच येथे कसल्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नसून येथे गाळे स्वरूपात सर्व शटर असलेली दुकाने आहेत. त्यामुळे या रहिवासी परिसरात कोविड सेंटरला मान्यता देण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र निदर्शने किंवा अन्य कायदेशीर मार्गाने विरोध केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मंगलनाथ कॉलनी परिसरात कोविड सेंटरला रहिवाशांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:32 AM