बीड : नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा व माहिती देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना वेळोवेळी बोलावूनदेखील बैठकीस हजर राहिले नाहीत, त्यामुळे बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यावर गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवण्यात आला, तसेच त्यांना निलंबित करावे, असा ठराव मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पारीत करण्यात आला.
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या प्रसंगी मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावण्यात आले. वेळोवेळी माहिती मागवूनही डॉ.गुट्टे यांनी माहितीची पूर्तता केली नाही, तसेच काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निरोप देऊनही पालकमंत्र्यांच्या बैठकीस ते उपस्थित राहिले नव्हते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी सर्व विभागांकडून विविध विषयांची माहिती मागविण्यात येते. याप्रसंगी मुख्याधिकारी गुट्टे यांच्याकडून नगरपालिकेतील विविध विकासकामे, अनुपालन अहवाल व योजनांची माहिती मागविण्यात आली होती. दरम्यान, ती माहितीही त्यांनी दिली नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचा ठराव घेण्यात आला तसेच तात्काळ कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.
डिसेंबरमध्येच माहिती दिली
अनुपालन बैठकीची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे १७ डिसेंबर, २०२० रोजी दिली आहे. याबाबत मी त्यांना बोललोही होतो. सदरील अनुपालन हे जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यालयाकडून हलगर्जी झाल्याने नियोजन अधिकारी कार्यालयाकडे पोहोचले नाही. यात मुख्याधिकारी या नात्याने माझी काहीच चूक नाही. सदरील बाब पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या तात्काळ निदर्शनास आणून दिली आहे.
डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी नगरपालिका, बीड
माहिती सादर केलेली नाही
आमच्याकडे माहिती सादर केलेली नाही. आवक-जावक हे जिल्हाधिकारी कार्यालयातील आहे, असेही माहिती दिल्यावर त्यांनी बोलायला हवे होते. बीड नगरपालिका आमच्या कार्यालयापासून खूप दूर नाही.
मिलिंद सावंत
जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरविकास विभाग, बीड