लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शासकीय - निमशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर भूमीपुत्र या नात्याने जबाबदारीचे भान ठेवत यापुढे गाव विकासासाठी झटण्याचा संकल्प राज्य परिवहन महामंडळातील वाहतूक नियंत्रक, राष्ट्रीय कबड्डीपटू तथा मॅक बँकेचे संचालक श्रीमंत उबाळे आणि पाटोदा येथील कृषी पर्यवेक्षक अरूण उबाळे यांनी केला आहे.
या दोघांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बीड पंचायत समितीचे उपसभापती मकरंद उबाळे, बीड जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बळीराम उबाळे, ब्रम्हदेव शेळके, अभिमन्यू उबाळे, देवीदास उबाळे, भारत उबाळे, रोजगार सेवक शहादेव उबाळे, माणिक उबाळे, बबन उबाळे आदी उपस्थित होते. बळीराम उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. चऱ्हाटा येथील कबड्डीची चार मैदाने बंद पडली आहेत. तेथे लवकरच कबड्डी खेळ पूर्ववत सुरू करण्यात येईल. चऱ्हाटा गावातून पुन्हा विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय कबड्डीपटू निर्माण करण्याचे काम करणार असल्याचे श्रीमंत उबाळे म्हणाले. कृषी पर्यवेक्षक अरुण उबाळे यांनी चऱ्हाट्यामध्ये ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आदी कृषिविषयक योजना राबविण्यासाठी गावातील लोकांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.