बीड : शहरात कार्यरत रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचा ३० वा पदग्रहण सोहळा थाटात पार पडला. विविध पुरस्कारांसह गरजू महिलांना मोफत शिलाई मशिन तर फुटपाथवर बसणाऱ्या व्यावसायिकांचा मोफत छत्र्या देऊन श्रमसन्मान करण्यात आला.
मावळते अध्यक्ष समीर काझी व सचिव राहुल तांदळे यांच्याकडून नूतन अध्यक्ष राजेश बंब, नूतन सचिव इंजि. मोहम्मद आरेफ यांनी पदभार स्वीकारला. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारूक, रोटरी ३१३२ चे प्रांतपाल डॉ. ओम मोतीपवळे, माजी प्रांतपाल हरीश मोटवाणी, अक्षय शेटे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी क्रेडाई बीडचे अध्यक्ष इंजि. अतुल संघाणी, सचिव पारस ललवाणी, ३१३२ च्या फर्स्ट लेडी सविता मोतीपवळे, रूद्राणी अक्षय शेटे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात रोटरी मिडटाऊन व क्रेडाईच्या संयुक्त विद्यमाने एम.एस.ई.बी.चे सेवानिवृत्त अभियंते जयंत राजाराम पत्की, इंजिनीयर व बिल्डर सुरज मंगेशराव तेंडुलकर व बीड नगर परिषदेचे अभियंते अखिल अहमद फारुकी यांना आदर्श अभियंता पुरस्कार देण्यात आला. कोरोनाकाळात ज्या कुटुंबातील कर्ता माणूस गेला आहे, अशा कुटुंबांना मदत स्वरूपात १० शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले. क्लबने निवडलेले शिक्षक कोटुळे ज्ञानेश्वर सुंदरराव, शेळके श्रीहरी न्यानोबा, मुंडे आश्रुबा रामराव, सय्यद अतिक अहमद सय्यद नाजेर अली, शोभा दिनकरराव कुलकर्णी, राजकुमार तुकाराम राठोड, सारिका भीमराव गुंजाळ, नंदकिशोर गंगाराम ढगे, सुमेध सखाराम जोगदंड, केदारनाथ चव्हाण, शेख मुनव्वर सुलतान, अनुराधा मारुती दंतूलवाड यांचा कुटुंबासह सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याच्या वक्फ बोर्डवर समीर काझी यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून रोटरीने ई-लर्निंग उपक्रम सुरू केल्याची माहिती या वेळी देण्यात आली. दातृत्वाचा यज्ञ रोटरी मिडटाऊन सुरूच ठेवणार असल्याचे नूतन अध्यक्ष राजेश बंब यांनी या वेळी सांगितले. डॉ. ओम मोतीपवळे यांच्या हस्ते नूतन सदस्य राहुल बोरा, जीवन बंड, जुनेद काजी, प्रकाश राका, शेख रब्बानी यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन नितीन गोपन व अनुराग जैन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रोजेक्ट चेअरमनसह डॉ. सुरेंद्र बजाज यांनी विशेष परिश्रम घेतले.
180921\18_2_bed_16_18092021_14.jpg~180921\18_2_bed_17_18092021_14.jpg
राेटरी मिडटाऊन~राेटरी मिडटाऊन